पारोळा : तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. मात्र त्यांना एसटीच्या अनियमिततेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे दैनंदिन पासने प्रवास करणारे विद्यार्थी त्रस्त आहेत. याच कारणाने विद्यार्थ्यांनी येथील बस स्थानकावरच ३१ जुलै रोजी ठिय्या आंदोलन केले. तसेच बस नियमित वेळेत सोडण्याची मागणी केली.येथून अंचळगाव, आमडदेमार्गे दुपारची बस गेल्या पंधरा दिवसापासून येत नाही. इतर बसदेखील आठवड्यातून दोन ते तीन दिवस बंद असतात. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार आगार प्रमुखांकडे तक्रार केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या त्रासाला कंटाळून जवळपास १०० विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी माजी आमदार चिमणराव पाटील, भडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले आदी उपस्थित होते.दोन दिवसात बस नियमित करण्याचे आश्वसन आगारप्रमुखांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. तालुक्यातील ग्रामीण भागातील किमान चार ते पाच हजार विद्यार्थी दररोज शहरात शाळा-महाविद्यालयांमध्ये ये-जा करतात. मात्र ब-याच गावांना बस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची गैैरसोय होते.