पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मुसा हे गॅरेज चालक असून कासोदा येथे वास्तव्याला असून त्यांची तब्येत बरी नसल्याने पत्नी व मुलांसह ११ जुलै रोजी घराला कुलूप लावून गेले होते. घराच्या शेजारी राहणारे शेख जमिल शेख मुनीर यांनी मंगळवारी शेख मुसा यांना फोन करुन घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व घर उघडे असल्याचे कळविले. त्यानुसार त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता कपाटातील लॉक तुटले होते तर साहित्याची नासधूस झालेली होती. कपाटात ठेवलेले ६६ हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, १८ हजार रुपये किमतीच्या ६ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, ९ हजार रुपये किमतीच्या ३ ग्रॅमच्या रिंगा, ६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या फुली, १२ हजार ५०० किमतीच्या चांदीच्या अंगठ्या, ११ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पट्ट्या, १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी, दीड हजार रुपये किमतीच्या चांदीच्या तीन पट्ट्या व ३५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. शेख यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार करीत आहेत.
मास्टर कॉलनीत पावणेदोन लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST