धुळे : सुशिक्षित बेरोजगाराला व्यवसायाकरिता कर्ज मिळवून देण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅँकेकडे शिफारस करण्याच्या मोबदल्यात 500 रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक भटू लाला सूर्यवंशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी झाली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. बेरोजगार तक्रारदाराने सुधारित बीज भांडवल योजनेअंतर्गत राज्य शासन व राष्ट्रीयकृत बॅँकेकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज केला होता. उद्योग निरीक्षक भटू सूर्यवंशी यांनी कागदपत्र व अर्ज तपासून कर्जासाठी बॅँकेकडे शिफारस करण्यासाठी तक्रारदाराकडून 500 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीच्या आनुषंगाने सापळा लावला आणि सायंकाळी 5.24 वा. भटू सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारल्यानंतर पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अवैध खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोडण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचखोर पोलीस रवींद्र पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले. अँटीकरप्शन जळगाव विभागाच्या पथकाने ही कारवाई 27 रोजी दुपारी नगरदेवळा बसस्थानकाजवळ सापळा लावून फत्ते केली. तक्रारदार हे टाकळी प्र.चा. ता.चाळीसगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचा ट्रॅक्टरद्वारे गौणखनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार हे 25 रोजी कजगाव येथून मुरुमाची वाहतूक करीत असताना पोलीस नाईक रवींद्र पाटील यांनी त्यांचे ट्रॅक्टर अडविले. कजगाव परिसरातून गौण खनिजाची वाहतूक करायची असल्यास मला दहा हजार रुपये द्यावे लागतील. या मोबदल्यात ट्रॅक्टरही सोडतो असे रवींद्र पाटील याने सांगितले. तक्रारदाराने एसीबीला माहिती दिली. सापळा लावून लाचखोर पोलिसाला पकडले.
लाचखोरीचा उद्योग!
By admin | Updated: November 28, 2015 00:22 IST