जळगाव : शहरातील विकास दूध विक्रीच्या बूथचालकांकडून या बूथवर रंगविलेल्या विकास दूध, तूप, दही आदींच्या जाहिरातीचा खर्च उपटण्याचा डाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने आखला आहे. आता हा डाव हाणून पाडण्यासाठी दूध बूथचालक एकवटले आहेत. पण या मंडळीला दूध संघातील व्यवस्थापन भेटायलाही तयार नाही.
शहरात ८४ बूथचालक विकास दूध व या दुधाचे इतर उपपदार्थ विक्री करणारे ८४ बूथचालक आहेत. हे बूथचालक जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था र्मयादित, जळगाव यांच्या अंतर्गत कार्यरत आहेत. या बूथचालकांना महापालिकेने रस्त्यांनजीक जागा उपलब्ध करून दिली आहे. या बूथमध्ये दूधपुरवठा करण्याची जबाबदारी कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेला दूधपुरवठा करतो. या संस्थेकडून रोजच्या रोज दूध व इतर उपपदार्थ विकासच्या बूथचालकांकडे पोहोचते.
विपणन विभागाची टक्केवारी?
जिल्हाभरात विकास दुधाच्या वितरकांना दुधाचे उपपदार्थ विक्रीची मुभा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विपणन विभागाने दिली आहे. परंतु ज्या वितरकांना फक्त उपपदार्थ विक्रीचा परवाना आहे त्यांना दूध विक्रीची मुभा दिली जात नाही. तसेच मर्जीतल्या वितरकांना पुरेसे बटर, तुपाचा पुरवठा केला जातो, अशा तक्रारी वितरकांमध्ये आहेत. यासंदर्भात रावेरच्या काही वितरकांनी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु कुणाला उपपदार्थ द्यायचे, कुणाला दूध विक्रीचा परवाना द्यायचा हा अधिकार दूध संघाचा आहे. वितरक किंवा विक्रेते परस्पर कोणतीही मागणी करू शकत नाही, असे लिमये यांनी या वितरकांना खडसावले होते.
जाहिरात अनधिकृत
विकास दुधाच्या बूथवर विकास दूध व इतर उपपदार्थांची जाहिरात आहे. विकास दूध जिल्हा सहकारी दूध संघाचे उत्पादन किंवा ब्रँड आहे. यातच मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत जाहिरातींसंबंधी दिलेल्या निर्देशानुसार विकास दुधाच्या बूथवरील जाहिराती या अनधिकृत धरत त्यांच्याद्वारे झालेल्या प्रसिद्धीपोटी जिल्हा सहकारी दूध संघाला महापालिकेने सहा लाख रुपयांचे बिल पाठविले आहे. विकास दुधाच्या बटरची नेहमीच चणचण जिल्ह्यात असते. हे बटर इतर जिल्ह्यांमध्ये, मध्य प्रदेशात टक्केवारी घेऊन दिले जाते. त्याचे ग्राहकही ठरले आहेत. यातच काही उपपदार्थ खासगी व्यापार्यांना दिले जातात. हे व्यापारी त्याची विक्री आपल्या नावाने किंवा आपापल्या ब्रँडने करतात, अशी कुजबुजही दूध संघात आहे. अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे.
---------------
जाहिरात दूध संघाची, पण खर्च बूथचालकांकडून घेणार
आता विकास दुधाच्या जाहिरातींचे पालिकेने दिलेले बिल दूध संघाला भरणे अनिवार्य आहे. पण हे पैसे विकास दुधाच्या बूथचालकांकडून वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशा नोटिसा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेकडून बूथचालकांना १२ डिसेंबर रोजी दिल्या गेल्या. जे विक्रेते किंवा बूथचालक या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी सूचना नोटिसीत दिली गेली. त्यानंतर १६ रोजी एक बैठक कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेत झाली. तीत जाहिरातींच्या बिलापोटी महापालिकेने पाठविलेले बिल भरण्यासाठी बूथचालकांकडून दर महिन्याला ७00 रुपये घेण्याचे निश्चित झाले. याला बूथचालकांनी विरोध केला. जाहिरात तर जिल्हा सहकारी दूध संघाच्या विकास दुधाची आहे. तिचा खर्च बूथचालकांनी का भरावा, असा प्रश्न बूथचालकांनी उपस्थित केला आहे. त्यासंबंधी जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची भेट घेण्याचा प्रयत्नही या बूथचालकांनी केला. पण त्यांना लिमये यांनी भेटण्याची वेळ दिली नाही, अशी माहिती मिळाली. विकास दुधाच्या बूथचालकांची बैठक बोलावली होती. बूथवरील जाहिरातींपोटी महापालिकेने पैशांचे बिल दूध संघाला दिले आहे. या जाहिरातींचे पैसे कुणी भरावेत याच्याशी आमचा काहीएक संबंध नाही. जिल्हा सहकारी दूध संघाच्या सूचनेनुसार बैठक बोलावली होती. त्यात विक्रेत्यांकडून जाहिरातीचा खर्च घेण्यासंबंधी फक्त चर्चा झाली. निर्णय कोणताही झाला नाही. -विश्वनाथ पाटील, व्यवस्थापक, कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था, जळगाव