लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची भीती, लॉकडाऊन त्यातच लसीकरणाचे निकष या काही गोष्टींमुळे विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. यामुळे रक्तसाठाही आटत आहे. आगामी काळात नॉनकोविड यंत्रणा पूर्णत: सुरू झाल्यानंतर मात्र रक्ताचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील गोळवलकर रक्तपेढीत आगामी तीन दिवसांचाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सिव्हिल रक्तपेढी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या रक्तपेढीत सद्या १७५ बॅगा शिल्लक आहेत. यांची मुदत संपेपर्यंत साधारण एक महिन्यापर्यंत मागणीनुसार त्यांचा पुरवठा होईल, मात्र, या ठिकाणी नॉनकोविड यंत्रणा सुरू झाल्यानंतर हीच मागणी दुप्पट होणार आहे. त्यामुळे तेव्हा रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
रक्तदात्यांची संख्या निम्म्यावर
आताची परिस्थिती बघितली असता थेट या रक्तकेंद्रांवर येऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या निम्म्यावर झाली आहे. गेल्या वर्षभरात नियमित कॅम्प कमी झाले असले तरी सरकार व राजकीय पक्षांच्या आवाहनानंतर रक्तदान वाढले व त्यामुळे तुटवडा निर्माण झाला नाही, मात्र, नॉनकोविडनंतर मागणी दुप्पट होण्याची शक्यता रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आकाश चौधरी यांनी व्यक्त केली आहे. सद्या मागणीपेक्षा अधिक साठा असल्याचे त्यांनी सांगितले.
गोळवलकर रक्तपेढी
शहरातील गोळवलकर रक्तपेढीत केवळ ८० बॅगांपर्यंतचा रक्तसाठा शिल्लक आहे. हा साठा मागणीनुसार पुढील तीन दिवस जाऊ शकतो, कोविड, लॉकडाऊन आणि लसीकरण या काही बाबींमुळे रक्तदानाच्या चळवळीला गेल्या वर्षभरात ब्रेक लागला असून, मागणीच्या निम्म्यापेक्षाही कमी रक्तसाठा संकलित झाल्याचे रक्तपेढीकडून सांगण्यात आले. या ठिकाणी वर्षभराची मागणी ही सुमारे सहा हजार बॅगांची असून, या ठिकाणी केवळ २७०० बॅगा रक्तसंकलित झाले.
रेड प्लस रक्तपेढी
या रक्तपेढीत साधारण आठवडाभर पुरेल इतका रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामानाने हा साठा अत्यंत कमी असून, रक्तसंकलन घटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात साडेसहा हजार बॅगांची मागणी असताना साडेपाच हजार बॅगा उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, आता नॉनकोविड सेवा सुरुळीत सुरू झाल्यानंतर ही मागणी दुपटीने वाढून रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असे रक्तपेढीचे संचालक डॉ. भरत गायकवाड यांनी सांगितले.