------------
नोंदणी पण यादीत नाव नाही...
जळगाव : लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली. मात्र, तरी सुध्दा केंद्रावरील यादीत नाव नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मंगळवारी नानीबाई रूग्णालय याठिकाणी यादीत नाव नाही म्हणून लसीकरणाला आलेले काही नागरिक घरी परतले. यामुळे गोंधळ निर्माण होत असून हा संभ्रम सोडविण्याची मागणी होत आहे.
-----------
कुटुंब सर्वेक्षण
जळगाव : माझे कुटुंब-माझी जबाबदारी अंतर्गत शिक्षकांना कुटुंब सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या मोहिमेला पुन्हा सुरूवात झाली आहे. शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून शिक्षकांकडून कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात आहे. मात्र, आरोग्य किट न मिळाल्यामुळे शिक्षकांची नाराजी अजूनही कायम आहे.
----------
हल्ल्याचा निषेध
जळगाव : कोलकत्ता येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर पंधरा ते वीस गुंडांकडून हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांना शिवीगाळ, मारहाण तसेच कार्यालयाचे नुकसान करण्यात आले. या हल्ल्याचा जळगाव अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिद्धेश्वर लटपटे यांनी केली आहे.
----------
वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांवर कारवाई करावी
जळगाव : खासगी वाहनात लस देणाऱ्या कानळदा येथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जळगाव (ग्रामीण) तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर मनोज चौधरी, पुंडलिक सोनवणे, भाऊसाहेब येवले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.