मुक्ताईनगर : भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे. याप्रकरणात मोठी गँग अडकली आहे. येत्या दोन दिवसात या घोटाळ्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी आयोजित सत्काराच्या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला. या प्रकरणात ज्यांना जमीन लागेल त्यात राष्ट्रवादीचा एक ही नेता नाही. शिवाय भाजप सोडून माझ्यासोबत आलेल्यांचंही नाव नाही.
मात्र त्यांनी भाजपचं थेट नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा संपूर्ण रोख भाजप नेत्यांकडे होता. जे तुमच्या मनात आहे ते यात आहेत. त्यामुळे या घोटाळ्यातील भाजपमधील हा बडा नेता कोण? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान मी संकट मोचक नाही. मी अडचणीतून मार्ग काढणारा आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं