प्रभाग समितीनिहाय २०० जणांची यादी तयार : थकबाकी न भरल्यास मालमत्तांवर बोझा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा प्रशासनाने या वर्षापासून मालमत्ता कराची वसुलीची स्थिती वाढविण्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या असून, मालमत्ताकराच्या वसुलीसाठी आता मनपाने मोठ्या थकबाकीदारांवर नजरा जमविल्या आहेत. यासाठी प्रभाग समितीनिहाय ५० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, ३० जूनपर्यंत या थकबाकीदारांनी मालमत्ता कराची रक्कम न भरल्यास या थकबाकीदारांचा मालमत्तांवर बोझा बसविण्याची तयारी मनपा प्रशासनाने सुरू केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मनपाची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही. त्यातच मालमत्ताकराच्या रकमेतूनच मनपाला चांगले उत्पन्न मिळत असते. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षी या उत्पन्नावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यावर्षी मनपाने कोरोनावर नियंत्रण आणण्यासोबतच मालमत्ता कराची वसुली कशी होईल? याकडे लक्ष केंद्रित केले आहे. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत मालमत्ताकराची एकूण रक्कम भरणाऱ्या मालमत्ताधारकांना मनपाने वर्षाच्या एकूण कराच्या रकमेवर १० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मनपाने ११ कोटींची वसुली केली आहे. मात्र, ३० जूनपर्यंत ज्या थकबाकीदारांनी रक्कम भरली नाही, अशा थकबाकीदारांवर मोठी कारवाई करण्याची तयारी आता मनपाने सुरू केली आहे.
मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार
मनपा प्रशासनाने प्रभाग समिती निहाय प्रत्येकी ५० प्रमाणे शहरातील २०० थकबाकीदारांची माेठी यादी तयार केली आहे. यामध्ये शहरातील अनेक दिग्गजांची नावे असून, लवकरच या थकबाकीदारांच्या नावांची यादी शहरातील मुख्य चौका-चौकात लावण्यात येणार आहे. तसेच वृत्तपत्रांव्दारेदेखील जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, तरीही थकबाकीदारांनी रक्कम न भरल्यास त्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर बोझा चढविण्यात येणार आहे. यासाठी मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी प्रभाग समितीनिहाय पथकंदेखील तयार केली आहेत.
सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी कसरत
मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र, शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्थींमुळे हा आयोग लागू करताना मनपाला अडचणी येत आहेत. त्यात एक अट म्हणजेच मनपाची वसुली ही ९० टक्केपेक्षा जास्त पाहिजे, मनपाची वसुली ही दरवर्षी केवळ ७० टक्क्यांपर्यंत पोहचते. या आयोगाचा लाभ मनपा कर्मचाऱ्यांना व्हावा यासाठी मनपाला मालमत्ताकराची वसुली वाढवावी लागणार असून, यासाठीच आता मनपा प्रशासनाने मोठ्या थकबाकीदारांना रडारवर घेण्यास सुरुवात केली आहे.
कोट.
मालमत्ताकराची एकूण रक्कम भरणाऱ्या मालमत्ताधारकांना ३० जूनपर्यंत १० टक्के सवलत देण्यात आली आहे. मालमत्ताधारकांना याचा लाभ घेतला पाहिजे. तसेच काही मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच यासंदर्भात कारवाईला सुरुवात केली जाईल.
-प्रशांत पाटील, उपायुक्त, मनपा