जळगाव : बीएचआर घोटाळ्याशी शालेय पोषण आहाराचेही कनेक्शन पुढे येऊ लागले आहे. बीएचआरमधून कर्ज घेतलेल्यांच्या कर्जामध्ये ठेवी वर्ग करण्याकरिता ठेवी आणून देणारा एजंट आकाश माहेश्वरी हा शालेय पोषण आहाराचा ठेकेदार असल्याचे सुनील झंवर याने अटकेत असताना मान्य केले आहे, त्यामुळे तपासाला वेगळीच दिशा मिळाली असून बीएचआर आणि शालेय पोषण आहार याचा संबंध आहे का, असेल तर तो कसा? यादृष्टीने आता तपास केला जात आहे.
पोलिसांनी सुनील झंवर याचे कार्यालय व घरझडतीत दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक्स पुरावा जप्त केला असून तेदेखील त्याने मान्य केले आहे. याआधीच्या तपासातदेखील बीएचआरच्या ई-टेंडरिंगमध्ये झंवर याने शालेय पोषण आहाराच्या कामासाठी वाहन पुरविणारे ठेकेदार व सब ठेकेदार यांच्या नावाने निविदा भरलेल्या असून २२ जणांची नावे पुढे आली होती. त्याशिवाय यापूर्वी जिल्हा परिषदेचा शालेय पोषण आहाराचा घोटाळा चर्चेत आला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याच संदर्भात एक गुन्हाही दाखल झालेला आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यमंत्र्यांकडे शालेय पोषण आहाराच्या घोटाळ्याबाबत बैठक झाली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. २०१८ मध्ये नांदेडमध्ये असाच घोटाळा झाला होता.
तपासाची दिशा जिल्हा परिषदेकडे
आता पुन्हा बीएचआरमध्ये शालेय पोषण आहाराचे ठेकेदार, सब ठेकेदार यांचा संबंध आल्याने तपासाची दिशा पुन्हा जिल्हा परिषदेकडे वळणार असल्याचे सांगितले जात आहे. सुनील झंवर याच्याकडे महाराष्ट्रासह इतर राज्यातील शालेय पोषण आहाराचा ठेका आहे. या योजनेतील वाहन चालक, मालक यांच्याशी कनेक्शन पुढे येत आहे. त्यांच्या नावानेदेखील व्यवहार झाल्याने हे सर्वच जण आता रडारवर आलेले आहेत. दरम्यान, बीएचआर पतसंस्थेसाठी बनविण्यात आलेले सॉफ्टवेअर झंवर याच्या कार्यालयात कशासाठी इन्स्टॉल करण्यात आले होते, ते लिंक का केले? लिलाव प्रक्रिया कशी नियंत्रित केली? याबाबत झंवर काहीच बोलायला तयार नाही. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर झंवर हा इंदूरमध्ये कंडारेच्या ओळखीच्या व्यक्तीकडे राहत होता हेदेखील आता स्षष्ट झालेले आहे.