जळगाव : बहुचर्चित बीएचआर घोटाळा ज्या वेळेस झाला, त्यावेळेस गुलाबराव पाटील हे सहकार राज्यमंत्री होते. त्यांच्याच आशिर्वादाने एवढा मोठा घोटाळा लपविण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेमध्ये केला.
धरणगाव तालुक्यातील ११ कोटींची कामे जिल्हा परिषदेत मंजूर असताना ई-टेंडर काढण्यात आले. १९ कामे ही इस्टीमेट रेटला एका सोसायटीवर मॅनेज झाले. एकूण २२ कामांपैकी बांभोरी, बोरगाव व साकरे याठिकाणातील तीन कामे मॅनेज झाली नाही म्हणून ती कामे रिकॉल टेंडर प्रक्रियेला असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पत्राद्वारे रद्द केली. नंतर खेडी फाटा ते खेडी रस्ता, फुपनगरी फाटा ते फुपनगरी रस्ता व आव्हाणी ते भोकणी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणे ही कामे त्यांनी ज्या गावात शेती घेतली, त्या गावात म्हणजेच आव्हाणे, फुपनगरी व खेडी या कामांना अधिका-यांवर दबाव आणून मंजूर करून घेतले, असाही आरोप जानकीराम पाटील यांना केला आहे.
नगरसेवक गैरहजर राहिले, पालकमंत्र्यांनी उत्तर का दिले नाही
संजय राऊत जळगाव जिल्हा दौ-यावर आले असताना २७ नगरसेवक गैरहजर राहिले. याचे उत्तर पालकमंत्र्यांनी का दिले नाही, कारण जळगाव महानगरपालिकेला जो निधी दिला. त्यात प्रत्येक नगरसेवकाकडून १० टक्के घेतल्याशिवाय टेंडर करण्यात आले नाही. म्हणून नगरसेवक गैरहजर असल्याचाही आरोप जानकीराम पाटील यांना केला. तसेच पालकमंत्री यांनी ३ कोटींची जमीन ८ लाख रूपयात खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली.
हायमास्टचा हट्टहास का?
प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपालिकेत स्ट्रीट लाईट उपलब्ध असताना सुध्दा प्रत्येक गावाला हायमास्ट देण्याचा अट्टहास पालकमंत्री का?. या पैशातून १०० हेक्टरमध्ये धरण उभे राहिले असते तर पेव्हर ब्लॉक व हायमास्टचा अट्टहास पालकमंत्री का करीत आहेत, असा सवाल पाटील यांनी केला आहे.
जानकीराम पाटील यांनी आपली योग्यता तपासावा - राजेंद्र चव्हाण
जानकीराम पाटील यांनी केलेल्या आरोपांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देणे टाळले असून, त्यांच्याऐवजी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी जानकीराम पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. आव्हाणे ते खेडी, वडनगरी दरम्यान पालकमंत्र्यांची कोणतीही जमीन नसून, केवळ राजकीय व्देषापोटी हे आरोप केले जात आहेत. तसेच याबाबत कोणताही पुरावा पाटील यांनी सादर केला नाही. तसेच आव्हाणी-भोकणी दरम्यानच्या रस्त्याचे काम देखील मंजूर झाले असले तरी कोणत्या पुढाऱ्याची जमीन आहे म्हणून रस्ता मंजूर होत नाही. जानकीराम पाटील हे पालकमंत्र्यांचा आशिर्वादामुळे जि.प.सदस्य झाले होते. आता त्यांच्यावर आरोप करून स्वत: मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच बीएचआर ही मल्टीनॅशनल संस्था असून, त्यावर केंद्र शासनाचे नियंत्रण असते. त्यामुळे सहकार राज्यमंत्री असताना यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील पुर्णपणे चुकीचा असल्याचे राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.