जळगाव : पुणे येथील घोले रोड शाखेतील गैरव्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आलेली भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था (बीएचआर) गुरुवारीदेखील बंदच होती. या पतसंस्थेच्या शहरातील सर्वच शाखा बंद असल्याचे दिसून आले. या पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांचा मोबाईलवर गुरुवारीदेखील प्रतिसाद मिळाला नाही. संचालकही शहरात नसल्याची अफवा पसरली. बीएचआरच्या शहरात आठ शाखा आहेत. ४ व ५ जून आणि १0 व ११ जून ला या सर्व शाखा बंद होत्या. पुण्यात घोले रोड शाखेत १६0७ कोटीचा बेहिशोबी व्यवहाराचा आरोप बीएचआर पतसंस्थेवर आहे. बीएचआरच्या नवीपेठेतील शाखेला खाजगी संस्थेकडून सुरक्षा व्यवस्था पुरविली जात आहे. वेगवेगळ्य़ा वेळांमध्ये दोन सुरक्षा रक्षक शाखेच्या मुख्य दरवाजानजीक असतात. काही अडचणी असतील तर सुकलाल माळी, दिनेश चौधरी, मितेश पोतदार यांच्याशी संपर्क साधावा, असे बीएचआरने एका खुलाशाच्या फलकावर खालच्या भागात लिहिले आहे. पण हे तिघेही प्रतिसाद देत नसल्याचे शाखेनजीक जमलेल्या ठेवीदारांनी सांगितले. पतसंस्था सुरू आहे की बंद हे पाहण्यासाठी ठेवीदार एकामागून एक असे येतच होते. ते सुरक्षा रक्षकाला विचारणा करीत होते. परंतु सुरक्षा रक्षक त्यांना या पतसंस्थेची कोणताही संबंध नाही, असे सांगून आपली असर्मथता व्यक्त करीत होता.
'बीएचआर'चे ठेवीदार वार्यावर
By admin | Updated: June 13, 2014 14:57 IST