नंदुरबार : शहरात चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी भरदिवसा नळवा रस्त्यावरील योगेश्वर कॉलनीतील घर फोडून चोरट्यांनी चार लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. दरम्यान, याच भागात दोन दिवसांपूर्वी काही नागरिकांनी चोरीच्या उद्देशाने फिरणार्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतरही पोलिसांनी सतर्कता न बाळगल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. नंदुरबारात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या महिन्यात झालेल्या चोर्यांचा तपास लागत नाही, शिवाय पोलीस वसाहतीतच झालेल्या चोरीचाही तपास लागलेला नसताना चोरट्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. सोमवारी दुपारी योगेश्वर कॉलनीत चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. योगेश्वर कॉलनीतील प्लॉट नंबर २७ मध्ये राहणारे राजाराम शंकर पाटील हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या शेजारीदेखील बाहेरगावी गेले होते. ती संधी साधून दुपारच्या वेळी चोरट्यांनी राजाराम पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. शयनकक्षातील लोखंडी कपाट व त्यातील तिजोरीचा कप्पा तोडून चोरट्यांनी सव्वाचार तोळ्याचे दागिने तसेच दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुपारी तीन वाजेनंतर पाटील परिवार घरी परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घरात घुसल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर एकच धावपळ उडाली. लागलीच पोलिसांना पाचारण करण्यात आले. चोरीची रक्कम पाहता पोलिसांनी श्वानपथक मागविले. श्वानाने घरापासून सोमेश्वरनगर, महादेव मंदिर व तेथून अहिंसा चौकापर्यंतचा माग दाखविला. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.
भरदिवसा घरफोडी
By admin | Updated: May 20, 2014 01:13 IST