मेसन : महिलांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या ॲश बार्टी आणि पुरुष गटात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अलेक्सांद्र ज्वेरेव यांनी शनिवारी येथे पहिल्यांदात वेस्टर्न आणि सदर्न ओपन (सिनसिनाटी ओपन) टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
२५ वर्षांच्या बार्टीने आपल्या दमदार सर्व्हिसच्या जोरावर विश्वात २२ वे रँकिंग असलेल्या अँजेलिक कर्बर हिला ६-२,७-५ असे पराभूत केले. अंतिम फेरीत तिचा सामना ७६ व्या क्रमांकाच्या जिल टिचमानसोबत होईल.
वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश करणाऱ्या टिचमानने या आधी नाओमी ओसाका आणि बेलिंडा बेनसिचला पराभूत केले. उपांत्य फेरीतदेखील तिने चौथ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाह हिला ६-२,६-४ असे पराभूत केले आहे. त्यामुळेच ती आता सध्याची विम्बल्डन विजेती बार्टीच्या विरोधात फायनलमध्ये खेळेल.
पुरुषांच्या गटातील अंतिम सामना ज्वेरेव आणि सातव्या क्रमांकावरील आंद्रे रुबलेव यांच्यात खेळला जाईल. तिसऱ्या मानांकन प्राप्त ज्वेरेवने दुसऱ्या मानांकन प्राप्त स्टेफनोस सिटसिपाला ६-४,३-६, ७-६(४) असे पराभूत केले. रुबलेवने अव्वल मानांकित दानिल मेदवदेवला २-६,६-३,६-३ असे पराभूत केले.