लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय कामात अवैध वाळू वापरल्याच्या प्रकरणात जळगाव ते औरंगाबाद रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला जामनेर तहसीलदारांनी ३८ लाख ४ हजारांचा दंड ठोठावला आहे. तहसीलदार अरुण शेवाळे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे. या दंडाची नोटीस जे.बी. कन्स्ट्रक्शनचे पी.व्ही. श्रीनिवास यांना पाठवण्यात आली आहे. गुप्ता यांनी भवानी फाटा नेरी ते जळगाव या २० किमीच्या रस्त्यासाठी अवैध वाळूचा वापर केल्याची तक्रार केली होती.
याबाबत ३ जुलै रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजणी केली होती. त्यात १००५ ब्रास वाळू साठा अवैध आढळून आला होता. त्याबाबत कंपनीने केलेल्या खुलाशानुसार १८४ ब्रास वाळू शेगाव जि. बुलडाणा येथून उचल केल्याचे दिसून आले आहे. मात्र त्याची पडताळणी केली असता हा वाळू साठा शेगाव ते बारामती व आळंदी असा केलेला दिसून आला आहे. जामनेर तालुक्यात कंपनीची साईट असल्याने सुनसगाव येथील कोणतीही पावती आढळून आलेली नाही. त्यामुळे १८४ ब्रास वाळू ही अवैध उत्खनन करून वाहतूक केल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार १८४ ब्रास वाळूची रॉयल्टी ५ लाख ९१ हजार ३६३ रुपये होते. त्याच्या पाच पट रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. ही रक्कम ३८ लाख ४ हजार १६ रुपये एवढी होते. या दंडाबाबत मुदतीत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अन्यथा दंडाची रक्कम मान्य आहे असे समजून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी ठेकेदार कंपनीला दिली आहे.