कजगाव, ता. भडगाव : अंगणात झोपलेल्या युवकांच्या प्रसंगावधानामुळे मोटारसायकलची चोरी टळली; अन्यथा चोरीचे हे सत्र ‘ब्रेक के बाद’ सुरूच राहिले असते. मात्र युवकांच्या समयसूचकतेमुळे मोटारसायकल चोरी टळली.
कजगाव येथील पाचपावली मातानगरमधील रहिवासी ज्ञानेश्वर देविदास महाजन यांच्या घराजवळ लावलेली मोटारसायकल चोरण्याच्या इराद्याने तीन अज्ञात चोरटे या मोटारसायकलचे हँडल लॉक तोडत असतानाच समोर राहात असलेला युवक पप्पू सोनार हा अंगणात झोपलेला होता. काहीतरी आवाज आल्याने इकडेतिकडे बघितले, तेव्हा समोर तीन उंच तरुण मोटारसायकलचे लॉक तोडत असल्याचे लक्षात आल्याने पप्पू सोनार यांनी गाडी मालक यास मोबाइलवर फोन करून गाडी चोरणारे आले आहेत. तुझ्या मोटारसायकल जवळ उभे असल्याचे सांगितले.
गाडी मालक व त्याचा भाऊसह पप्पू सोनार यांनी आरडाओरडा केल्याने या भागातील तरुण गोळा झाले नि मग अज्ञात चोरट्याचा पाठलाग सुरू केला. तब्बल दीड ते दोन तासापर्यंत शोध मोहीम राबवली. मात्र चोरटे अंधाराचा फायदा उचलण्यात यशस्वी झाले.
चाैकट
चोरट्यांची शोधाशोध, पण..
दरम्यान, कजगाव पोलीस मदत केंद्रावर पाच पावली मातानगरमधील काही तरुण तेथे पोहोचले, तर त्या ठिकाणी कोणी पोलीसच नव्हते. दोन होमगार्ड तेथे होते, त्यांना घटना सांगितल्यानंतर त्यांनी अज्ञात चोरट्याची शोधाशोध केली. मात्र अज्ञात चोरटे पसार झाले. लागोपाठ होणाऱ्या मोटारसायकलच्या चोऱ्यांमुळे वाहनधारकात घबराट पसरली आहे.
पोलिसाची अद्याप नियुक्ती नाही..
महिन्याभरापासून सुरू झालेले चोरीचे सत्र मात्र थांबण्यास तयार नाही. याची पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी दखल घेऊन कजगावच्या पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी दिवस व रात्रीसाठी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यानेच याचा फायदा चोरटे उचलत आहेत.