जळगाव रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमजवळ आल्यावर जळाल्यासारखा वास आल्याने संशयावरून ते एटीएमकडे वळले. तेथे जाताच गॅस कटरच्या साह्याने शटरचे कुलूप व एटीएम कापण्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी गस्तीवरील असलेले ईश्वर देशमुख व राजपूत यांना घटनास्थळी बोलावून घेतले. तसेच माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील घटनास्थळी दाखल झाले. बँकेचे व्यवस्थापक किरण पाटील व जागेचे मालक तुषार बनकर हजर झाले.
चोरटे झाले फरार
पोलीस येत असल्याचा सुगावा लागताच चोरटे घटनास्थळावरून फरार झाले. पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी स्वतः पाेलीस कंट्रोल रूमला माहिती देऊन तातडीने जळगाव जिल्ह्यात अलर्ट जारी केला. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.
पाळत ठेवून पलायन
एटीएमच्या मागील बाजूस डॉ. डी.पी. पाटील यांच्या इमारतीतून एटीएममध्ये रात्री २.१९ मिनिटांनी चोरट्यांनी प्रवेश केला. पुरावा मिळू नये म्हणून त्यांनी एटीएममधील कॅमेऱ्यांवर स्प्रे मारला. यानंतर गँस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या शटरचे कुलूप कापले. एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न सुरू होता. एक चोरटा पोलिसांवर बसस्थानक परिसरात पाळत ठेवून असावा, असा कयास आहे. त्यामुळे पोलीस येत असल्याचे लक्षात येताच चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. चोरटे २.३८ मिनिटांनी फरार झाले. त्यांचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
बँकेचा हलगर्जीपणा
एटीएमजवळ सुरक्षारक्षक तैनात करण्यासाठी पहूर पोलिसांनी एकदा नव्हे तर दोनदा बँकेला पत्र दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र सुरक्षा रक्षक नसल्यानेच हा प्रकार घडला. पहूर येथे स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या एन्ट्रीने फसला.