जळगाव : स्वातंत्र्य चौकातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढत असलेल्या शांताराम पुना गोपाळ (३५,रा.रामेश्वर कॉलनी) या तरुणाशी खोटे बोलून व हातचलाखीने एटीएम कार्ड व पासवर्ड विचारुन दोन ठिकाणी ६७ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात चंद्रशेखर कुमार प्रदीप सहानी (२८,रा.बैजनाथपुर, जि.कटीहार, बिहार) याला सायबर पोलिसांनी शनिवारी अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्या.जी.जी.कांबळे यांनी १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.रंजना पाटील यांनी काम पाहिले. १० ते ११ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ही घटना घडली होती.
भोलाणे गावातून बैलाची चोरी
जळगाव : तालुक्यातील भोलाणे गावातून राजेंद्र काशिनाथ कोळी यांच्या मालकीचा ४५ हजार रुपये किंमतीचा बैल चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी घडली आहे. कोळी यांनी याबाबत पोलीस अधीक्षक व तालुका पोलिसांकडे तक्रार केली असून त्यात गावातीलच काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे.