प्रमोद ललवाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कजगाव, ता. भडगाव : घरात कोणताही राजकीय वारसा नाही. मोलमजुरी करत उदरनिर्वाह करणारे रावण भिल्ल यांचे कुटुंब मिळेल ते काम करायचे अन् पुढे चालायचे. राजकारणाचा कोणताही गंध नाही. राजकारणाची ओढ नाही. मात्र जनता जनता जनार्दनाला रावण पुढे गेला पाहिजे म्हणूनच जनतेच्या आशीर्वादाने ते ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच ते थेट भडगाव पंचायत समितीच्या उपसभापती पदावर विराजमान झाले.
बांबरूड बुद्रूक, ता. भडगाव येथील रहिवासी आदिवासी कुटुंबातील सदस्य असलेले रावण भिल्ल यांचे शिक्षण बाबरूड येथील प्राथमिक शाळेत झाले. जेमतेम शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत मिळेल ते काम करत घर परिवाराचे रहाडगाडगे ओढत असतानाच रोजंदारीवर काम करत असतानाच ऐन तारुण्यात सालदारकी सुरू केली. मोलमजुरी करणे हेच आपले विश्व समजत प्रामाणिकपणे १५ वर्षे सालदारकी केली.
या दरम्यान ग्रामस्थांचे प्रेम मिळाले. आपल्याप्रति ग्रामस्थांमध्ये प्रेम निर्माण केले अन् ग्रामस्थांच्या मनात आपलं घर निर्माण केलं. मग ग्रामस्थांनी त्यांना राजकारणात ओढण्यासाठी प्रयत्न केला. त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. त्यानंतर पुढील पंचवार्षिकीत बिनविरोध उपसरपंच, यानंतर मात्र चुरशीच्या निवडणुकीत बाजी मारत सरपंच पदावर विराजमान झाले.
ना राजकारणाचा गंध, ना घरात राजकीय वारसा. केवळ जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने राजकारणात प्रवेश झाला. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य ते ग्रामपंचायत सरपंच या पदावर असताना प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या रावण यांच्यावर आमदार किशोर पाटील यांनी विश्वास टाकत गोंडगाव गणातून पंचायत समिती सदस्यासाठी उमेदवारी दिली. या चौरंगी सामन्यात रावण भिल्ल विजयी झाले. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या कामाचा झपाटा सुरूच ठेवल्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत साऱ्यांनाच भावली नि भडगाव पंचायत समितीच्या उपसभापती पदाची संधी चालत आली. १३ ऑगस्टला ते या पदावर विराजमान झाले. हे वृत्त गोंडगाव गणात पसरताच अनेकांनी भिल्ल यांचे अभिनंदन केले
बांबरूड गावच लकी
बांबरुड गावाला या अगोदर सभापती, उपसभापती, प्रभारी सभापती अशी पदं चालून आली. यात रत्नाबाई कैलास पाटील या सन २०१० प्रभारी सभापती, यानंतर सन २०११/१२ मध्ये सभापती, यानंतर सन २०१५ मध्ये राजेंद्र लालचंद परदेशी यांना प्रभारी सभापती म्हणून पद चालून आले. आता याच गावातील रावण भिल्ल हे १३ रोजी भडगाव पंचायत समितीच्या उपसभापती पदावर विराजमान झाले. बांबरुड गाव लहान. मात्र या गावाला पद चालून आले, हे विशेष.