जळगाव : गणपती नगरातील दालमिल व्यापारी रमेशचंद्र जाजू यांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोघा जणांना सुरत येथून अटक करण्यात आली आहे. अरूण वेलजी क्याडा व कौशिक रामभाई पटेल (दोन्ही रा.सुरत) असे अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांना शुक्रवारी हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रमेशचंद्र जाजू यांच्याकडून १९ लाख ७८ हजार ४५० रुपये किमतीची तूर डाळ व चणा डाळ माल हा मुकेश कथोरोटीया याने त्याच्या व्यापाऱ्यासाठी खरेदी केला होता. मालाची केवळ २ लाख ८८ हजार रुपयाची रक्कम कथोरोटीया याने अदा केली. मालाची उर्वरित १६ लाख ८९ हजार ९५० रुपयांची रक्कम दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच, २० फेब्रुवारी रोजी त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सहा जणांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपासात सर्वप्रथम नीलेश वल्लभभाई सुदाणी सुरत यास अटक करण्यात आली होती. दरम्यान, संशयित अरूण क्याडा हासुद्धा सुरत येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. गुरुवारी सुरत गाठत पोलिसांनी त्यास अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, मूग व चणा डाळ ही कौशिक पटेल याला विक्री केली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच तपासचक्र फिरवित पटेल यालासुद्धा अटक केली.
सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
शुक्रवारी दोन्ही संशयितांना न्या. एस. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद, राकेश बच्छाव, साईनाथ मुंडे आदींनी केली आहे.