लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील कोविड रुग्णालयात सर्वाधिक ३६८ रुग्ण दाखल आहेत तर सौम्य लक्षणे असलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणची माहिती घेतली असता या रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये अग्निशमन सिलिंडर असल्याची माहिती देण्यात आली. जीएमसीत प्रत्येक कक्षाच्या बाहेर एक अग्निशमन सिलिंडर लावण्यात आले आहे. शिवाय इलेक्ट्रीक व फायर ऑडिटच्या दृष्टीने पाहणीही करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जीएमसीतील स्थिती
जीएमसीत प्रत्येक कक्षाबाहेर एक अग्निशमन सिलिंडर लावण्यात आले आहे. मध्यंतरी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणीही केली होती. अग्निशमन विभागाकडून नुकतेच या ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात आले होते. अग्निशमन सिलिंडर कसे वापरावे याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी पुरेसी सुरक्षा असल्याचे सांगण्यात आले.
कोविड केअर सेंटर
दरम्यान, शासकीय आयटीआयच्या एका इमारतीत रुग्णांना ठेवण्यात आले असून या ठिकाणचे मुख्य गेट अरूंद आहे. या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर प्रशासनाची तारांबळ उडत असते, या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक असतो, जेवणाच्या वेळी अधिक गर्दी होत असते, सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाच्या वेळी गर्दीचे वातावरण असते. नातेवाईक अनेक वेळा थेट आत मध्ये जात असतात, यावरून वादही होत असतात. मात्र, एकच मुख्य गट असून आपात्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नसल्याची स्थिती आहे.
कोट
कोविड केअर सेंटरमधील अग्निशमन सिलिंडरची मी स्वत: पाहणी केली आहे. सर्व सुरळीत आहे, पुन्हा एकदा ते कॉलेज प्रशासनाकडून तपासण्यात येतील. आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असते. त्या दृष्टीने सुरक्षा बाळगली जाते. - डॉ.विजय घोलप, वैद्यकीय अधिकारी, मनपा
जीएमसीतील रुग्ण : ३६८
कोविड केअर सेंटर ६ इमारती : ५५८ रुग्ण