पहूर कक्ष-१ अंतर्गत पहूर गावठाण, गोंदेगाव एजी, वाकोद एजी, वाकोद गावठाण, नाचनखेडा एजी (पाळधी) व वाॅटर एक्स्प्रेस पहूरमध्ये समाविष्ट असलेले लोंढ्री व शेरी असे सहा फिडर असून शेतीशिवार साडेचारशे व शहरी बासष्ट किलोमीटरच्या परिसरात वीज पुरवठा सुरू आहे. दोन लाईनमनवर सहा फिडर
पहूर कक्ष हा राष्ट्रीय महामार्गावर असून संवेदनशील आहे. या ठिकाणी शहरी व ग्रामीण असे वीज वितरणचे दोन कक्ष आहेत. पैकी शहरी कक्ष एक येथे उपकार्यकारी अभियंता व्ही. डी. सोणवणे व सहायक अभियंता जितेंद्र अवचारे यांच्या अधिपत्याखाली होते. मात्र या दोघांची बदली झाल्याने १५ दिवसांपासून पदे रिक्त आहे. तसेच प्रधान तंत्रज्ञ एक, वरिष्ठ तंत्रज्ञ सहा, कनिष्ठ तंत्रज्ञ चार व विद्युत सहायक तीन अशी १४ पदे मंजूर असताना या ठिकाणी आजच्या तारखेत वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमन) नितेश भगवान देशमुख व योगेश मंगलसिंग बेलदार फक्त दोघांच्या खांद्यावर पहूर कक्ष सुरू आहे तर कनिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र तवर एकमेव कार्यरत असून तेही दिव्यांग आहे.
तसेच लाईनमन लक्ष्मीकांत खाचने व मच्छींद्र ताठे सहा महिन्यांपासून बेपत्ता आहे व आर. बी. सोळंकी याचे दर्शन दुरापास्त आहे.
विजेचा प्रश्न गंभीर
गेल्या काही दिवसांपासून विजेच्या समस्येत वाढ झाली. या ठिकाणी नितेश देशमुख व योगेश बेलदार हे दोनच लाईनमन आहेत. त्यांच्यावर विजेचे व्यवस्थापन, वसुली व येणारे विजेचे प्रश्न सोडविण्याची अतिरिक्त जबाबदारी ओढवली आहे. तसेच रात्री अपरात्री उठून पावसात जीव धोक्यात घालून विजेचा प्रश्न निर्माण झाल्यावर शेतीशिवाराचा साडेचारशे किलो मीटर अंतराचा परिसर व शहरी भागाचा ६२ किलोमीटर अंतर पायदळी घालावा लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी विलंब होतो. पर्यायाने नागरिकांची गैरसोय होते.
जंगलात २४ तासांपैकी १६ तास भारनियमन आहे. आठ तास वीज पुरवठा असला तरी या ठिकाणी परिसर मोठ्या प्रमाणावर असून अतिरिक्त वीज भार व भारनियमन आहे. त्यातही अपुरे मनुष्यबळ असल्याने वीज समस्या शोधण्यासाठी विलंब होतो. याचा परिणाम विजपुरवठ्यावर होतोय.
पेठ ग्रामपंचायतचे निवेदन
दुर्लक्षित
पेठ ग्रामपंचायत सरपंच नीता पाटील यांनी नितेश देशमुख यांची मुख्यालयी नियुक्ती व संबधित लाईममन यांनी मुख्यालयी राहण्याची मागणी निवेदनाद्वारे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता व्ही. डी. सोणवणे यांच्याकडे केली. यानंतर आंदोलन केले. पण वीज वितरण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
प्रतिक्रिया
बदली अधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती नसल्यामुळे माझ्याकडे तात्पुरता पदभार आहे. नवीन असल्याने रिक्त लाईनमनच्या पदाबाबतची मला माहिती नाही. हा निर्णय वरिष्ठांचा आहे.
- गजानन कोष्टी, प्रभारी सहायक अभियंता
उपविभाग, कक्ष दोन पहूर.
रिक्त कर्मचाऱ्यांच्या जागांमुळे दहा कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त काम मी व योगेश बेलदार आम्ही दोघे करीत आहोत. जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करावे लागतात. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करताना विलंब होतो. पर्यायाने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
- नितेश भगवान देशमुख,
वरिष्ठ तंत्रज्ञ