अमळनेर : दैवाने अपंगत्व दिलं...सासू गेली...नवराही गेला... एकमेव आधार असलेला कमावता मुलगाही गेला...जगण्याचा आधार गेला... त्यामुळे ही महिला निराधार झाली होती. देशाचे सुपुत्र असलेल्या खान्देश सुरक्षारक्षक संस्थेने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन तिला आर्थिक मदतीचा आधार दिला. स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सवी जणू काही या निराधार महिलेला अमृतच मिळाले.
अमळगाव येथील सुतार कुटुंबात अवघ्या सहा महिन्यात एका अपंग महिलेने सासू आणि पती गमावला , एकुलता एक मुलगा रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका करीत होता. मात्र दुर्दैवाने दहा दिवसांपूर्वी त्याचाही अपघातात मृत्यू झाला. त्या अपंग मातेवर जगण्याचे संकट कोसळले. याविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत सैन्य दलातील कर्मचारी व सेवानिवृत्त जवान यांच्या खान्देश सुरक्षारक्षक या संस्थेद्वारे गरीब व विधवा अपंग आईला ३२हजार १०१ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. संस्थेचे संस्थापक सचिन पाटील , तालुका अध्यक्ष विवेक पाटील व उपाध्यक्ष विजय सूर्यवंशी, कार्याध्यक्ष महेंद्र बागुल, भूषण पाटील, कार्यरक्षक आणि एकूण १३५ रक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली.
कार्यक्रमाला संजय पाटील तसेच संस्थेचे मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी, विलास महाले, किरण पाटील, पोकॉ. भूषण पाटील, तलाठी पराग पाटील, सरपंच छाया वसंत मोरे, रवींद्र श्यामराव कोळी, ग्रा.पं. सदस्य, गुलाब रघुनाथ कोळी, ग्रा. पं. सदस्य, आणि गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी यांनी गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले.