ईश्वराने हे विश्व निर्माण केले आहे. मानव ही त्याची एक अद्भुत अशी निर्मिती आहे. ईश्वर म्हणजे परमात्मा हाच जिवात्मा बनून मनुष्य रुप धारण करतो आणि वेळ आली की तो जिवात्मा पुन्हा त्या परमात्म्यामध्ये विलीन होतो हा जन्म मरणाचा फेरा सतत चालत असतो. मानवी जीवनाला ईश्वराची अंतरिक ओढ असते. कितीही नास्तिक असला तरी कुठे तरी मनात या गुढ शक्तीची जाणीव ही असतेच. या कलीयुगामध्ये आले जीवन कसे असावे हे आपल्या विचारावर अवलंबून आहे. आपल्याला ईश्वराची आवड किती आहे, आपण त्याची उपासना करण्यास पात्र आहोत अथवा नाही हे ज्यावेळी आपल्याला जाणवते तेव्हा सद्गुरूचे पाय धरावे तेव्हा सद्गुरूची कृपा होऊन आपण परमार्थाच्या मार्गावर येऊ शकतो. मनाच्या आत असलेले दोष ईश्वराच्या नामस्मरणाने धुतले जातात.हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय ...पवित्रची होय देह त्याचा ।।या माऊली ज्ञानोबांच्या ओळी हेच सांगून जातात. नामस्मरणाने दोष धुतले गेले की मन आणि विचाराला एक अद्भत अशी शक्ती प्राप्त होते. ज्यावेळी मन शक्तीवान होईल तेव्हा बुद्धी विचार करायला लागून आपण आपोआप ईश्वरीय शक्तीकडे ओढले जातो. ईश्वरीय शक्तीची एकदा जाणीव झाली की तिचा उपयोग करून या जिवाला कल्याणाचा मार्ग सापडतो. जिवाचे कल्याण होते. कारण गुरू हे ईश्वरी अनुभव घेतलेले जिवात्मे असतात. गुरू म्हणजे एखादी व्यक्ती नसून ती एक ईश्वरीय शक्ती आहे.त्यांच्या मार्गदर्शनाने परमार्थाचा मार्ग कसा चालावाा हे आपल्याला कळून येते. आपण एखाद्या गुरूचे शिष्यत्व पत्करले असेल तर त्या गुरूला भक्तीने शरण जा. आपली जर नितांत श्रद्धा असेल तर ईश्वरी शक्तीचा आदेश होऊन, शक्ती आपल्याला अनुभवता येते. परमेवर शक्ती जिवंत आहे. ती आपल्याला योग्य वेळी मार्ग दाखविते. मार्ग दाखविते याचाच अर्थ आपल्याला ज्ञान प्राप्त होते. आणि ज्ञान प्राप्त झाले म्हणजे ईश्वरी शक्ती अनुभवाला आलीच पाहिजे आणि हे फक्त हा जिवात्मा जिवंत आहे तेव्हाच शक्य आहे.श्रद्धा ठेवा कारण श्रद्धा म्हणजे काय तर आपल्याला गुरूंनी घालून दिलेला परमार्थाचा पारंपारिक मार्ग. तो मार्ग आपण सातत्याने श्रद्धापूर्वक आचरावयाचा आहे. सदाचरण करावे. अपशब्द न बोलता गुरूवाक्य गुरूनाम पुन्हा - पुन्हा आठवत जावे तरच तुम्हाला परमेश्वराचे सहाय्य होईल.- नाना महाराज कुलकर्णी, पिंप्राळा.
सन्मार्ग आणि सन्मतीलाभो सदा सत्संगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:29 PM