लोकमत न्यूज नेटवर्क
कजगाव, ता. भडगाव : १९९८नंतर तितूर नदीला आलेल्या या महापुराने कजगाव परिसरातील चार खेड्यातील असंख्य शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे पीक काही तासातच पुराच्या प्रवाहात वाहत गेले नी शेतकऱ्यांचे आर्थिक गणिताचे स्वप्नदेखील त्या सोबत वाहत गेले. हताश झालेला शेतकरी आपल्या नशिबाला दोष देत बसला आहे. शासन, प्रशासनाकडून मिळत असलेल्या आश्वासनाची आस तेवढी बाकी आहे.
येथील नदीकाठावरील अपंग वयोवृध्द शेतकरी शिवसिंग राजधर पाटील यांची पाच बिघे शेती नदीकाठालगत केटीवेयरला लागून आहे. दि. ३१ला आलेल्या महापुरात संपूर्ण शेतातील कपाशी व कांदा हे पीक मुळासकट वाहत गेले. पुराच्या प्रवाहाने पाचपैकी दोन बिघे शेतदेखील वाहून गेल्याने या जागेत दहा ते पंधरा फुटाचा खड्डा येथे पडला आहे. अपंग असलेला शेतकरी या धक्क्याने पार खचला आहे. कारण लाखो रुपये खर्च करून तो खड्डा भरला जाईल व शेतात माती टाकता येईल. मात्र येणारे उत्पन्नच वाहून गेलं आहे.
खर्च करावा कोठून? हाच प्रश्न अपंग शेतकऱ्यासमोर उभा आहे. दुसऱ्या बाजूला असलेले शेतकरी शांताराम चौधरी यांची तर चक्क विहीर जमीनदोस्त झाली आहे. सोबत सारी पाईपलाईन पुरात वाहत गेली. जमीनदेखील पुरात वाहती झाली. याचपद्धतीने रामसिंग सुपडू पाटील यांची शेतजमिनीसह केळीची झाडे पुरात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले.
याचपद्धतीने नदी किनाऱ्यावरील असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. मात्र मदत मिळण्यासाठी अनेक टप्पे पार पडतील. मग कुठं मोडकंतोडकं निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. तोपर्यंत बंजर झालेली शेती निळखत पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
चिखल गाऱ्यात सुरू झाले पंचनामे
नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात करण्याचे आदेश आले नी कजगाव, भोरटेक, उमरखेड,पासर्डी या चार गावांसाठी चार तलाठी, चार कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली. दोनच दिवसाचा वेळ असल्याने चिखल, गारा, नाल्याचे पाणी तुडवत हे सारे पंचनामेसाठी सरसावले आहेत.
रेशन दुकानदाराकडून धान्यवाटप
येथे तितूर नदीला आलेल्या महापुरात अनेकांचे संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे वाहून गेल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. झालेले नुकसान पाहून कजगाव येथील तिघा रेशनदुकानदारांनी नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ माणुसकीच्या नात्याने देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, रेशन दुकानदार भीमराव महाजन, दादाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, नीलेश पाटील, भूषण पाटील, रतन महाजन, गौरव पाटील, संदेश पाटील आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीकडून साफसफाई
तितूर नदीच्या महापुराने कजगाव गावाला वेढा घातल्याने जुनेगाव नवेगाव संपर्क तुटला होता. जुनेगाव नवेगाव दरम्यानच्या रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद पडला होता. या मार्गावर पुरामुळे गाळाचा थर चढल्यामुळे चिघट गाऱ्यामुळे मोटारसायकल घसरण्याचा धाक होता, पायी चालणे देखील मुश्कील होते. यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने तत्काळ मजुराकडून रस्त्यावरील चिकट गारा बाजूला करण्यात आला.
लक्ष मदतीकडे, अन् केटीवेयरच्या दुरुस्तीकडे
महापुराच्या प्रवाहात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे सारे आर्थिक गणित चुकली वर्षभराचा हिशेब विस्कळीत झाला. सारं काही गेल्याने निराश झालेला शेतकरी आता वाट पाहतो आहे. दुसरीकडे कजगावसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या केटीवेयरचा भराव वाहून गेल्याने कजगावचा पाणीप्रश्न व बागायत विहिरीचं जलस्तोत्रदेखील आटेल, असे म्हटले जात आहे.
020921\02jal_6_02092021_12.jpg~020921\02jal_7_02092021_12.jpg~020921\02jal_8_02092021_12.jpg
कजगाव च्या रेशन दुकानदारा कडुन धान्य वाटप महापुराचा प्रवाह इतका जोरदार होता की त्या प्रवाहात चक्क इलेक्ट्रिक चे लोखंडी पोल वाकले अपंग शेतकरी यांच्या वाहुन गेलेल्या शेतीत पडलेला खड्डा ~कजगाव च्या रेशन दुकानदारा कडुन धान्य वाटप महापुराचा प्रवाह इतका जोरदार होता की त्या प्रवाहात चक्क इलेक्ट्रिक चे लोखंडी पोल वाकले अपंग शेतकरी यांच्या वाहुन गेलेल्या शेतीत पडलेला खड्डा ~कजगाव च्या रेशन दुकानदारा कडुन धान्य वाटप महापुराचा प्रवाह इतका जोरदार होता की त्या प्रवाहात चक्क इलेक्ट्रिक चे लोखंडी पोल वाकले अपंग शेतकरी यांच्या वाहुन गेलेल्या शेतीत पडलेला खड्डा