लॉर्ड्सवरील विजयाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, विराट कोहली आणि संघ आता फक्त विजयासाठी खेळत आहे. ते प्रतिस्पर्धी संघाला डिवचतात आणि त्यांच्याशी भिडतदेखील आहेत. सिराजचा बाऊन्सर जेव्हा रॉबिन्सनला लागला तेव्हा त्याने माफी मागितली नाही, तर त्याच्यावरच डोळे वठारले. जणू काही सिराज त्याला सांगत होता, की ‘आक्रमकता फक्त तुम्हालाच दाखवता येत नाही. आम्हीदेखील तसेच उत्तर देऊ शकतो.’
भारतीय फलंदाजीच्या वेळीदेखील इंग्लंडच्या गोलंदाजांनी हेच केले होते. रॉबिन्सन हा प्रतिस्पर्धी संघाला अपशब्द वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो आधीच त्याच्या ट्विट्समुळे वादात सापडला होता. त्याने भारतीय फलंदाजांवर टिपण्णी केली होती. त्यामुळे त्यालाही तसेच उत्तर मिळाले. विराट कोहलीनेही भारतीय खेळाडूंना म्हटले होते की, ही साठ षटके इंग्लिश खेळाडूंना नरकासारखी वाटली पाहिजे.
सामन्याच्या अखेरच्या दिवशी बुमराह आणि शमीने बाजी पालटली. इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांचा त्यांनी सामनाच केला नाही तर त्यांना चांगलेच ठोकून काढले आणि त्यांच्यावर डोळे वठारले. ९२ मीटर लांब षटकार लगावत शमीने गहजबच केला. बुमराहने त्याला कमालीची साथ दिली. फक्त फलंदाजीच नाही, तर दोघांनी मिळून इंग्लंडच्या सलामीवीरांना शुन्यावर बाद केले. बाकीचे काम इशांत आणि सिराज यांनी पूर्ण केले.
सुनील गावसकर समालोचनात म्हणत होते की, भारताचा पूर्ण संघ अष्टपैलू खेळाडूंचा आहे आणि जलदगती गोलंदाज तर ७० - ८०च्या दशकातील वेस्ट इंडिजच्या जलदगती गोलंदाजांची आठवण करून देतात. शमी, बुमराह, इशांत आणि सिराज अशी गोलंदाजी करतात, की फलंदाजांना उसंत मिळू देत नाहीत.
९ महिने आधी हा संघ ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील पराभवानंतर लॉर्ड्स कसोटी जिंकली.
हे धैर्य कमालीचे आहे. जी आक्रमकता खेळाडूंनी दाखवली आहे. ती याआधी कधीच दिसली नव्हती. विजय-पराजय तर होत राहतील. मात्र, टीम इंडियाचा जो नवा चेहरा समोर आला आहे तो कमाल आहे. हा नवा भारत आहे. आता प्रतिस्पर्धी संघांना सांभाळूनच राहावे लागेल.