लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून मोहाडी रुग्णालयात ३० व्हेंटिलेटरच्या वादग्रस्त खरेदी प्रक्रियेतील पुरवठादार लक्ष्मी सर्जिकल यांनी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन टँकची निविदा पुरवठा आदेशानंतर मागे घेतली आहे. याबाबत त्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना पत्र दिले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक अतिरिक्त असा २० किलोलिटर क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन टँकला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर याची ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यात लक्ष्मी सर्जिकलने निविदेत भाग घेतला होता. त्यांनी १३ ऑगस्ट रोजी जीएमसीला पत्र दिले आहे. त्यांचे दर हे न्यूनतम ठरल्याने त्यांना पुरवठा आदेश देण्यात आले होते. पुरवठा आदेशातील दरानुसार आम्ही लिक्विड ऑक्सिजन टँक पुरवठा करण्यास तयार होतो. परंतु, काही वैयक्तिक कारणामुळे आम्ही आपल्यास टँकचा पुरवठा करू शकणार नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले होते.
प्रशासन संभ्रमात
जिल्हा रुग्णालयाकडून झालेल्या खरेदी प्रक्रियेत लक्ष्मी सर्जिकल यांनी मोहाडी रुग्णालयात ३० व्हेंटिलेटर पुरविले होते. मात्र, जीईएम पोर्टलवर मंजुरी मिळालेले व प्रत्यक्षात दिलेले व्हेंटिलेटर हे दुसऱ्याच कंपनीचे असून, यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केला असून, या व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रियेची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. त्यातच आता लक्ष्मी सर्जिकलने टँक पुरवठा करणार नसल्याचे पत्र दिले आहे, मात्र त्यात कारण नमूद केलेले नाही. त्यामुळे प्रशासनही संभ्रमात आहे.