अजय पाटील जळगाव : राज्यासह जिल्ह्यात यंदा पावसाने उच्चांक गाठला आहे. तब्बल सहा वर्षांनंतर जिल्ह्यात सरासरी पावसाने १२० टक्के पार केले आहेत. सहा वर्षांपुर्वीच म्हणजेच २०१३ मध्ये जिल्ह्यात १२६ टक्के पाऊस झाला होता. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १२२ टक्के पाऊस झाला असून, अजून परतीचा प्रवास शिल्लक असल्याने या सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे.कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १२२ टक्के पावसाची सरासरी गाठली आहे. जबरदस्त पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांसह लहान व मध्यम प्रकल्पामध्ये देखील जलसाठा फुल्ल झाल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील पाण्याची समस्या मिटली आहे. २०१३ पासून जिल्ह्यात पावसाने शंभरी देखील गाठली नव्हती. २०१५, २०१७ व २०१८ मध्ये जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. तसेच शेकडो गावांमध्ये टॅँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागला होता.सर्वच तालुक्यांमध्ये आबादानी२०१३ मध्ये जिल्ह्यात १२६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी तेव्हाही अमळनेर, जामनेर, धरणगाव या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला होता.त्यानंतर सहा वर्ष या तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती पहायला मिळाली. यंदा मात्र, जिल्ह्यातील सर्वच पंधरा तालुक्यांमध्ये सरासरीने शंभरी गाठली आहे. नद्या-नाल्यांना पुर आल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र आबादानी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १२२ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात परतीचा पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० आॅक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय राहणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात पावसाने हजेरी लावल्यास पावसाच्या सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे. २०१३ च्या सरासरीचा विक्रम आगामी काही दिवसातच मोडण्याची शक्यता आहे. दरम्यान, २००६ मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १३६ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे परतीचा पाऊसही जोरदार झाला. तर तब्बल १३ वर्षांपुर्वीचा पावसाचा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यात सहा ते सात वर्षाच्या फरकातच अशाप्रकारचा पाऊस होत असल्याचे सांगण्यात आले.दोन दिवस पावसाचा अंदाजसध्या, गुजरातवरील डिप्रेशन ईशान्य दिशेने वाटचाल करीत आहे आणि त्यामुळे येत्या २४ तासांत जळगाव आणि नाशिक यासारख्या ठिकाणी आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पाऊस कमी होईल आणि त्यानंतरच्या चार ते पाच दिवसांपर्यंत पावसाचा जोरदार फारच कमी राहण्याची शक्यता स्कायमेट या खासगी संकेतस्थळाकडून वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात तब्बल सहा वर्षांनंतर पावसाची सरासरी १२० टक्के पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 11:57 IST