जळगाव : जळगावात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या रुग्णांचे मुळात ज्यावेळी अहवाल पाठविण्यात आले होते किंवा हे रुग्ण ज्यावेळी बाधित होते, त्यावेळेपासून जिल्ह्याची कोरोनाची स्थिती बघता गेल्या महिनाभराच्या कालावधीत उलट सक्रिय रुग्णांची संख्या ही ८६८६ ने घटली आहे. तर मेच्या तुलनेत जूनमध्ये रुग्णसंख्या थेट ५ टक्क्यांवर आली आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट हा तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकतो, असा दावा तज्ज्ञांकडून होत असताना जळगावात या व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आल्याने तिसऱ्या लाटेची सुरुवात तर नाही, असा एक मतप्रवाह समोर आला होता व खळबळ उडाली होती. मात्र, एकत्रित आकडेवारी बघितली असता या १५ मे रोजी दैनंदिन बाधितांची संख्या ६१८ होती हीच संख्या १५ जून रोजी ६४ वर, तर २४ जून रोजी ३५ वर आली होती. त्यामुळे बाधितांची संख्या ही घसरत असल्याचे यावरून समोर येत आहे.
दहा दिवसांत पाच मृत्यू
मृत्यूचे प्रमाण हे घटले असून मृतांमध्ये वृद्धांचे मृत्यू अधिक होत असल्याचे चित्र गेल्या महिनाभरापासून समोर येत आहे. यात गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मृत्यूसंख्या घटून आता शून्यावर आली आहे. गेल्या दहा दिवसांत पाच मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मध्यंतरी दररोज वीस मृत्यू होत होते. मात्र, आता हीच संख्या १ किंवा २ वर आली आहे. त्यातही कमी वयाचे मृत्यूही घटले आहेत.
असा आहे महिन्याचा प्रवास
१५ मे दैनंदिन बाधित ६१८
एकूण रुग्णसंख्या : १३४५११
एकूण बरे झालेले रुग्ण : १२२४५२
मृत्यू : २४०६
सक्रिय रुग्ण : ९६५३
३१ मे दैनंदिन बाधित १५८
एकूण रुग्णसंख्या : १३९९८५
एकूण बरे झालेले रुग्ण : १३१८७४
मृत्यू : २५३२
सक्रिय रुग्ण : ५५७९
१५ जून दैनंदिन बाधित ६४
एकूण रुग्णसंख्या : १४१६५८
एकूण बरे झालेले रुग्ण : १३७३६१
मृत्यू : २५६४
सक्रिय रुग्ण : १७७३
२४ जून दैनंदिन बाधित ३५
एकूण रुग्णसंख्या : १४२१०७
एकूण बरे झालेले रुग्ण : १३७३६१
मृत्यू : २५६९
सक्रिय रुग्ण : ९६७