फोटो
गुढे, ता. भडगाव : जुवार्डी ग्रामस्थांचे १५ ऑगस्टपासून विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही उपोषणकर्त्यांची तब्बेत बिघडली होती. त्यामुळे प्रशासन हादरले होते. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आश्वासनांतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
दोन दिवसांपूर्वी खासदार उन्मेष पाटील यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तीन मागण्या जिल्हा परिषद प्रशासनाशी संबंधित असतानादेखील जि.प.कडून कोणीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
भडगावचे तहसीलदार सागर ढवळे यांच्यासह अधिकारी उपोषणकर्त्यांच्या संपर्कात होते.
उपोषणाच्या तिसरी दिवशी गटविकास अधिकारी आर.ओ. वाघ, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, वनक्षेत्रपाल यांनी ग्रामस्थांसोबत प्रदीर्घ चर्चा केली. त्यादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला गेल्यामुळे उपसरपंच पी.ए. पाटील यांनी मुंबई गाठली. त्यांनी आमदार किशोर पाटील यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जुवार्डीकरांशी चर्चा करून समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच जुवार्डी ग्रामस्थांसोबत लवकरच जळगाव येथे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
नजीकच्या काळात प्रश्न सुटले नाहीतर पुढील उपोषण जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जि.प.चे माजी सदस्य उत्तमराव महाजन पं.स.चे माजी सभापती संभाजी भोसले यांनी उपोषणस्थळी भेट दिली.