मुक्ताईनगर : बाहेर गावावरून आलेल्या चार सराईत गुन्हेगारांनी एका प्रौढ इसमावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शहरातील प्रवर्तन चौक भागात रविवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. या हल्ल्यात ओंकार विठोबा पाटील (वय ५५, रा. मुक्ताईनगर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरून तीन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक हल्लेखोर गोंधळात पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
शहरात प्रवर्तन चौक परिसरात भुसावळ व बऱ्हाणपूर येथील चार सराईत गुन्हेगारांनी देशी दारू समोरील दुकानांच्या बाहेर गोंधळ केला. त्यांना हटकले म्हणून या गुन्हेगारांनी प्रौढ ओंकार विठोबा पाटील व सागर ओंकार पाटील दोघे रा. भोई वाडा, मुक्ताईनगर यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ओंकार पाटील यांच्या मानेवर खोलपर्यंत धारदार शस्त्राची जखम झाली आणि मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना वाचविण्यासाठी धावपळ सुरू असताना हल्लेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य सुरू केले. यावरून संतप्त जमावाने हल्लेखोरांना चांगलाच चोप दिला.
या दरम्यान कोरोना गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक खताळ काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवत त्यांनी रमजानखान अय्युबखान (वय २१, रा.बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), शाहरूख आजम शेख (वय २३) व शिवम गोपाळ ठाकूर (वय २२, रा.भुसावळ) या तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले.