एकेकाळी औरंगाबाद, गंगापूर, बुलडाणा, जळगाव, जामनेर, पाचोरा, सोयगाव, भुसावळ या डेपोच्या जवळपास अकरा ते बारा बसेस येथे मुक्कामी राहत होत्या व दिवसभरात फेऱ्या मारीत होत्या. मात्र, गेल्या पंधरा ते वीस वर्षांत येथील खाजगी वाहतुकीची एवढी दादागिरी वाढली आहे की, आजतर दिवसाला एकही लालपरी (बस ) दृष्टीस पडायला तयार नाही, अशी विचित्र अवस्था या भागाची झालेली आहे.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांचेदेखील
पूर्णतः दुर्लक्ष
येथील प्रवासी संघटनेने बऱ्याच वेळा पाचोरा, जळगाव, सोयगाव, जामनेर या एसटी डेपोच्या व्यवस्थापकांना काही नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदने देऊन या भागात पूर्वीप्रमाणे लालपरीचा संचार वाढवून प्रवासीवर्गाला सुरक्षित प्रवास करण्याची संधी प्राप्त करून द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, सोयगाव व जळगाव डेपोने काही प्रमाणात प्रयत्न करून पाहिला; परंतु अवैध प्रवासी वाहतुकीसमोर त्यांनाही हार पत्करावी लागल्याचे दिसून आले. मात्र, या परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मंडळीविरुद्ध कोणत्याही प्रकारची कडक मोहीम राबवली नसल्याचे दिसून आले. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही येथील प्रवासी संघटनेला या परिसरात लालपरीचे साम्राज्य पुन्हा निर्माण करता आले नाही. त्यामुळे या भागातील प्रवासीवर्गाला आज आपला जीव धोक्यात घालून अत्यंत निकृष्ट वाहनांमधून नाइलाजाने प्रवास करावा लागत आहे. पाचोऱ्याच्या आमदारांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुन्हा एकदा बसेस सुरू करण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र शेळके यांनी केली आहे.