अडावद, ता.चोपडा : येथील सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाचा अपघात झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जवानाच्या दीर्घायुष्यासाठी ग्रामस्थांनी दिवे पेटवून महामृत्युंजय मंत्राचा जाप करीत दीर्घायुष्यासाठी दुर्गा मातेच्या मंदिरात मनोकामना केली.येथील खालच्या माळीवाड्यातील रहिवासी असलेले व सैन्यदलात १६ वर्षांपासुन सेवेत असलेले जवान मुकेश गुलाब महाजन (वय ३८) सध्या नेमणूक गोवाहाटी (आसाम) येथे सेवा बजावत होते. नुकतेच दिवाळीनिमीत्त सुटीवर ते येथे आपल्या घरी आले होते. ३१ आॅक्टोबर रोजी विखरण (ता.एरंडोल) येथून मामांची भेट घेऊन मुकेश अडावद येथे घरी येत असताना त्यांच्या दुचाकीचा धरणगाव-एरंडोल रस्त्यावर अपघात झाला. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी गावातील मित्र, नातेवाईक, ग्रामस्थांनी ४ रोजी येथील मनोकामना दुर्गादेवी मंदिरात मोठ्या संख्येने आपापल्या घरून दिवे पेटवून आणत महामृत्युंजय मंत्र, हनुमान चालिसा पठन करून आरती केली. याप्रसंगी मंदिर परिसर दिव्यांनी लखलखला होता. स्री, पुरुष आबालवृध्दांनी दुर्गादेवी चौक गच्च भरला होता.