जळगाव : जिल्हा परिषदेच्या गौण खनिज प्रकरणाचा अहवाल संबंधितांकडून लवकरच प्राप्त होणार असून, या अहवालानुसार जे या गौण खनिज प्रकरणात दोषी आढळून येणार आहेत. त्यांच्यावर पंचायत राज समितीच्या दौऱ्यापूर्वी कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे वेळ मागितली असून, पुढील आठवड्यात याबाबत बैठक होणार असल्याचेही आशिया यांनी सांगितले.
जि. प. सदस्या पल्लवी सावकारे यांच्या तक्रारीनंतर पंकज आशिया यांनी डेप्युटी सीईओ कमलाकर रणदिवे यांना सविस्तर अहवाल तयार करण्याचे सांगितले होते. त्यानुसार रणदिवे यांनी हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये २४ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तसेच यामध्ये सिंचन विभागातील ९ अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठोठावण्यात आला आहे. त्यात पंकज आशिया यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे हे प्रकरण नवीन वळणावर येऊन ठेपले आहे. शुक्रवारी गौण प्रकरणाबाबत आशिया यांनी गौण खनिज प्रकरणाचा लवकरच मागविण्यात येणार आहे. या अहवालात जे कुणी दोषी आढळून येतील, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगितले. तसेच ही कारवाई सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येणाऱ्या पंचायत राज समितीच्या दौऱ्यापूर्वी होणार असल्याचेही आशिया यांनी सांगितले.
इन्फो :
प्रशासनाच्या कारवाईकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष
दोन वर्षांपासून गाजत असलेल्या या प्रकरणात अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. मात्र, तक्रारदार पल्लवी सावकारे यांनी या गैरव्यवहार प्रकरणी पंकज आशिया यांच्याकडे पुरावे सादर केल्यानंतर, आशिया यांनी लगेच डेप्युटी सीईओंना अहवाल तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच या अहवालात आता ९ अधिकाऱ्यांवर ठपकाही ठेवण्यात आल्यामुळे, जि.प. प्रशासन आता नेमकी काय कारवाई करते, याकडे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.