सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडू देशमुख याच्याविरुद्ध १९९८ मध्ये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. दरम्यान, या गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती. दरम्यान, या शिक्षेविरुद्ध सरकार पक्षाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने देशमुख याला दहा वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेच्याविरोधात देशमुख याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही न्यायालयाने उच्च न्यायालयाची शिक्षा कायम ठेवून न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, तो हजर न होता तेव्हापासून फरार झाला होता.
पलायन केलेल्या बंद्याच्या शोधात गवसला
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असताना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातून पलायन केलेल्या शंकर रवींद्र चौधरी याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चाळीसगाव तालुक्यात असतानाच १२ वर्षांपासून न्यायालयाचा अवमान करून पोलिसांना चकवा देत असलेला बंडू देशमुख हिरापूर रोडवर असल्याची गुप्त माहिती हवालदार रामकृष्ण पाटील यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सहायक फौजदार अशोक महाजन, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, भारत पाटील व वसंत लिंगायत यांना सोबत घेऊन सापळा लावला असता तो जाळ्यात अडकला. त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.