जळगाव : जिल्हा पोलीस दलात फेरबदल झाल्यानंतर आता अंमलदार पातळीवरही काही बदल होणार आहेत. विनंती बदलीसाठी ४५० च्यावर अंमलदारांनी अर्ज केलेले आहेत, त्यातील २५० पेक्षा जास्त अर्ज एकट्या स्थानिक गुन्हे शाखेसाठी (एलसीबी) प्राप्त झालेले आहेत. त्याखालोखाल अर्ज हे जिल्हा विशेष शाखा, नियंत्रण कक्ष व शहर वाहतूक शाखेसाठी आहेत. क्राईम पोलीस ठाण्यांसाठी कमी अर्ज आलेले आहेत.
ऑगस्ट महिना हा पोलीस दलासाठी बदलीचा महिना होता. प्रशासकीय बदल्यांसाठी ३१ ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया वेळेत पार पडली. या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी योग्य समतोल साधला होता. आता विनंती बदल्यांमध्ये देखील कस लागण्याची शक्यता आहे. अर्थात विनंती बदल्यांना शासनाने गाईडलाईन दिलेली नाही, ते सर्वस्व अधिकार पोलीस अधीक्षकांचे असतात. त्यामुळे यावेळी ४५० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. गेल्या आठवड्यातच जिल्हा पोलीस दलात फेरबदल करून २६ पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलविण्यात आले. त्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सहायक व उपनिरीक्षक या दुय्यम अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ३१ ऑगस्टपर्यंत प्रशासकीय बदल्यांची मुदत होती, ती आता संपली आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर एकही प्रशासकीय बदली होणार नाही.
एलसीबीत १८ जागा रिक्त
प्रशासकीय बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत १८ जागा रिक्त झालेल्या आहेत. या शाखेत ९० च्या जवळपास कर्मचारी संख्या आहे आणि आता २५० पेक्षा जास्त अर्ज याच शाखेसाठी आलेले आहेत. अर्थात विनंती बदल्या करायच्या किंवा नाही याचे सर्वस्वी अधिकार पोलीस अधीक्षकांचेच असल्याने तशी सक्ती पण नाही, परंतु खरोखरच गैरसोय, अडचण व वैद्यकीय कारणे बघून समतोल साधला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ला दिली.
बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नित्याचाच
पोलीस दलाच्या बदल्यामंध्ये राजकीय हस्तक्षेप हा नेहमीचाच अनुभव आहे. याआधी तर थेट यादीच दिली जायची. यंदा मात्र ही प्रथा काही अंशी खंडित झाली असली तरी काही अंमलदारांनी अधिकाऱ्यांच्या मार्फत फिल्डिंग लावलेली आहे. मुख्यालयातील आरसीपीला असलेल्या तरुण पोलीस अंमलदारांच्या देखील यावेळी बदल्या होणार असून, गुणवत्ता तपासून त्यांना चांगल्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले जात आहे. विनंती बदल्यांच्या अर्जात क्राईम पोलीस ठाण्यासाठी अगदी कमी अर्ज आलेले आहेत.
कोट...
३१ ऑगस्टची डेडलाईन प्रशासकीय बदल्यांसाठी होती. विनंती बदल्यांना हा नियम लागू नाही. जिल्ह्यातील रिक्त पदांचा अंदाज घेऊन खरोखरच गरज आहे अशाच अंमलदारांच्या अर्जाचा विचार केला जाईल. साधारणत: आठवडाभरात विनंती बदल्या केल्या जातील.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक