जळगाव : शनिवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने शहर जलमय होऊन सर्वत्र पाणीच पाणी झाले. एकाच रात्रीत जळगाव मंडळात तब्बल ९९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील एकूण सहा मंडळात एकूण ३११.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात होणाऱ्या पावसाने शनिवारी मध्यरात्री दमदार हजेरी लावली. रात्री १२.१५ वाजता धुवाधार पावसाला सुरुवात झाली व १५ ते २० मिनिटात रस्ते जलमय झाले, इतका वेग या पावसाचा होता. इतकेच नव्हे जळगाव मंडळात तर ९९ मि.मी. पाऊस होऊन अतिवृष्टीची नोंद झाली. त्या खोलाखाल असोदा मंडळात ६५ मि.मी. तर नशिराबाद मंडळात ६० मि.मी. पावसाची नोंद झाली.
मंडळनिहाय झालेला पाऊस (मि.मी.)
जळगाव शहर- ९९
पिंप्राळा - ५३
म्हसावद २६
भोकर ११.२
नशिराबाद ६०
असोदा ६५
पिकांचे मोठे नुकसान
शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडे रविवारी एकूण आकडा उपलब्ध नसला तरी शिरसोली परिसरात कपाशीच्या शेतात पाणी साचून पीक आडवे झाले. या खेरीज तालुक्यात अनेक गावांमध्येही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.