लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पुढील महिन्यात तिसरी लाट येऊन मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येतील, असा इशारा नीती आयोगाने त्यांच्या अहवालात दिला असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही स्थानिक पातळ्यांवर सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. सद्य:स्थितीत एकूण बेडपैकी ९९ टक्के बेड रिक्त असून, तिसऱ्या लाटेसाठीच्या उपाययोजना झाल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यातील १६८३६ बेडपैकी १६८२५ बेड रिक्त आहेत.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा अधिक व कमी कालावधीत रुग्ण आढळून आले होते. शिवाय मृतांची संख्याही अधिक होती. त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेत एका दिवसाला लागणाऱ्या ऑक्सिजन साठ्याच्या तिपटीने तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करून ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्या दृष्टीने खासगी व शासकीय यंत्रणेत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम घेण्यात आले होते. मुक्ताईनगर वगळता अन्य १४ ठिकाणची कामे झाल्याची माहिती आहे.
‘डेल्टा प्लस’बाबत दक्षता
‘डेल्टा प्लस’ विषाणूचे जळगाव शहरात १३ बाधित समोर आले होते. मात्र, ते १३ रुग्णही पूर्णत: बरे झाले आहेत. यातील एकही रुग्ण गंभीर झालेला नव्हता. मात्र, त्यानंतर यंत्रणा सतर्क झालेली असून, ज्या भागात अचानक रुग्णवाढ समोर आली त्या भागात तातडीने सर्व्हे करण्यात येत आहे. तसाच सर्व्हे बोदवड तालुक्यात राबविण्यात आला.
जिल्ह्यातील बेडची परिस्थिती
एकूण ऑक्सिजन बेड : ३५८८, रुग्ण दाखल : ०२, रिक्त बेड ३५८६
एकूण आयसीयू बेड : ११२६, रुग्ण दाखल ०३, रिक्त बेड ११२३
एकूण व्हेंटिलेटर बेड : ४१५, रुग्ण दाखल ०३, रिक्त बेड ४१२
एकूण अन्य बेड : ११७०७, रुग्ण दाखल ०४, रिक्त बेड ११७०३
एकूण बेड १६८३६, रिक्त बेड १६८२५
शहरात रुग्णवाढ नसल्याने दिलासा
दुसऱ्या लाटेत जळगाव शहर हॉटस्पॉट म्हणून समोर आले होते. मात्र, मे महिन्यापासून शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात असून, आता केवळ ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविड केअर सेंटर गेल्या दोन महिन्यांपासून बंदच असून, ऑगस्टअखेरपासून तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी शक्यता वर्तविली होती. मात्र, शहरातील एकूण पॅटर्न बघता व तपासण्यांमधून समोर येणारी संख्या बघता सद्य:स्थितीत शहरातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.