लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या ८ लाख ९२ हजार ८० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी २६ एप्रिलपर्यंत १ लाख १७ हजार ९१६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर १३ टक्क्यांपर्यंत खाली आला असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवीत आहे. जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य यंत्रणेमार्फत माझे कुटुंब, माझी जबाबदारी, संशयित रुग्ण शोधमोहीम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचेही स्वॅब कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. जेणेकरून बाधित रुग्णाचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होतो.
संशयितांची तपासणी लवकर होऊन त्यांचा अहवाल त्वरित प्राप्त व्हावा, याकरिता जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्टचे ग्रामीण व शहरी भागात शिबिर आयोजित करण्यात येत आहे. अहवाल वेळेत मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार खासगी प्रयोगशाळांकडेही अहवाल तपासण्यासाठी पाठविले जातात. सध्या जिल्ह्यात दररोज पाच ते दहा हजार कोरोना संशयितांची चाचणी केली जात आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ज्यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवत असतील त्यांनी तातडीने जवळच्या तपासणी केंद्रांवर जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्या - ८ लाख ९२ हजार ८०
अँटिजेन ६ लाख २१ हजार ७५० - पॉझिटिव्ह ६७ हजार ४६१
आरटीपीसीआर - २ लाख ७० हजार ३३० - पॉझिटिव्ह ५० हजार ४५५