ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.4 - जिल्ह्यात दीड वर्षात 1 हजार 417 अपघात झाले असून त्यात 657 जणांचा मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू हे 20 ते 50 या वयोगटातील पुरुषांचाच झालेला आहे. सरासरी दिवसाला 5 अपघात होतात व त्यात दोन जणांचा मृत्यू होतो. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. हे अपघात रोखण्यासाठी तसेच सायबर गुन्हे व महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार असून त्यासाठी शाळा व महाविद्यालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.
शहरातील महाविद्यालय व विद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक व विविध शैक्षणिक संस्थांचे संचालकांसाठी पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात सोमवारी जनजागृती परिसंवाद झाला.
कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक सचिन सांगळे, रशिद तडवी (गृह) आदी व्यासपीठावर होते. दीपप्रज्वालनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी व सुरक्षा रक्षकांना पोलीस मित्र बनवा
अपर्णा मकासरे, पंकज ठाकूर, राजेंद्र वाघोदे, अमोल बाविस्कर, पीतांबर भावसार, यजुर्वेद्र महाजन, पत्रकार शेखर पाटील, अॅड. सूरज जहांगीर, डॉ. बोरकर यांच्यासह अनेक जणांनी चर्चेत सहभाग घेतला. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सायबर क्राईमला फाईट देण्यासाठी सायबर क्लब स्थापन करण्याची घोषणी केली.
कायदा पाळला तर घटनांना आळा
अनेक जण वाहने हौस व गरज म्हणून वापरतात. कमी वयात विद्याथ्र्याच्या हातात वाहने दिली जातात. मात्र कायद्याचे पालन केले जात नाही.
केवळ पोलिसांवर जबाबदारी टाकून मोकळे होणे चालणार नाही. कायदा पाळला तर अनेक गंभीर घटना टळतील. प्राचार्य व मुख्याध्यापकांनी त्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी. पाटील यांनी केले.