जळगाव : सहकार विभागाने केलेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचा धक्कादायक अहवाल हाती आला असून थोडय़ा नव्हे तर तब्बल 629 संस्था गायब असल्याचे समोर आले आहे. या संस्थांना आता अवसायनात काढण्याची नोटीस सहकार विभागाकडून बजावण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, 100 संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून नऊ संस्थांवर अवसायनाची कारवाई सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांची गेल्या आठ ते दहा वर्षापासून दैना झाली आहे. अनेक संस्थांनी ठेवीदारांना भरमसाट व्याजाचे आमिष दाखवून त्यांची लूट केली. हजार कोटींच्या वर ठेवीच्या रकमा या पतसंस्थांकडे अडकलेल्या आहेत. यात अनेकांवर गुन्हेही दाखल झाले, तर काही जणांना अटकही झाली. मात्र ठेवीदारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळू शकलेला नाही. या विरुद्ध ठेवीदार संघटनांच्या नेतृत्वाखाली सतत आंदोलनेही सुरू असतात. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नसल्याचीच प्रचिती येत आहे. तीन महिने चालले सर्वेक्षण सहकारी पतसंस्थांसह अन्य संस्थांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून संस्थांच्या सर्वेक्षणाचे आदेश केले होते. 1 जुलैपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. तब्बल तीन महिने हे कामकाज सुरू होते. सहकार विभाग व लेखापरीक्षक विभागाची खास पथके यासाठी नियुक्त करण्यात आली होती. 144 कर्मचारी, अधिका:यांनी हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. 548 संस्था कागदावर सहकार विभागाकडील माहितीनुसार जिल्ह्यात तीन हजार 912 सहकारी संस्थांची नोंदणी झालेली आहे. प्राप्त अहवालानुसार 548 संस्थांचे व्यवहार हे कागदोपत्री झाले असल्याचे लक्षात आले. 81 संस्था या नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आल्या नाहीत. या संस्थांचे पुनरुज्जीवन होऊ शकते काय? हे तपासून पाहण्यासाठी या 629 संस्थांना अवसायनाची नोटीस बजावली जाणार आहे. नोटीस बजावून या संस्थांचे प्रतिनिधी हजर झाल्यास त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. आतार्पयत 100 संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर नऊ संस्था अवसायनात घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
629 सहकारी संस्था गायब
By admin | Updated: October 6, 2015 00:47 IST