लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशातर्फे हर घर तिरंगा - घर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत रविवारी जळगाव जिल्ह्यातील सुमारे साठ हजार नागरिकांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या अभियानात जिल्ह्यात सर्वत्र ध्वजारोहण, तिरंगा फेरी, घरावर तिरंगा ध्वज लावणे, वृक्षारोपण, शहीदवंदना, वीरमाता, वीरपत्नी सत्कार आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले.
जळगाव अभाविपच्या वतीने जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ११० गावांत १२ हजार १२० घरांत भारतमाता प्रतिमा भेटरूपात देण्यात आली. या अभियानांतर्गत साठ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भारतमातेच्या प्रतिमापूजनात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे बसस्थानक, ट्रॅफिक सिग्नल, महाविद्यालये, कार्यालय, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, गणेश मंडळे या ठिकाणी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला. जळगाव जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. अभियानांतर्गत ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, मशाल यात्रा, परिषद की पाठशाला याठिकाणी वेशभूषा यात्रा, १६५ चौकांत सामूहिक भारतमातापूजन, ध्वजारोहण करण्यात आले. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी १०० विद्यार्थी, ६४ विद्यार्थिनीपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती अभियान जिल्हाप्रमुख इच्छेश काबरा व आकाश पाटील यांनी दिली.