बोदवड : छटाकभर भजे खाणे एका सेवानिवृत्त शिपायाला चांगलेच महागात पडले. ५० हजार रुपये चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून लांबवले. शहरातील गांधी चौकात बुधवारी दुपारी बाराला ही घटना घडली.
तालुक्यातील लोणवाडी येथील रहिवासी व जामठी येथील विद्यालयातील सेवानिवृत्त शिपाई असलेले ६४ वर्षीय प्रभाकर पुंजाजी बावस्कर यांना चार मुली असून, चारही मुलींची लग्ने झाली आहेत. ते पत्नीसह आपल्या आयुष्याची गुजराण सेवानिवृत्तीच्या पैशांवर करतात.
शहरातील स्टेशन रोडवरील स्टेट बँकेत असलेल्या खात्यातून गरजेनुसार प्रभाकर बावस्कर यांनी खात्यातून ५० हजारांची रक्कम काढली. ती दुचाकी (क्रमांक एमएच-१९-डीपी-७११५) च्या डिक्कीत असलेल्या पिशवीत ठेवली व ते शहरातील गांधी चौकात भजे खाण्यासाठी आले.
दुचाकी लावून त्यांनी भजे खाल्ले. त्यानंतर दुचाकीकडे गेले. दुचाकीची डिक्की त्यांना उघडी दिसली. त्यानंतर त्यांनी त्यात पाहिले असता दुचाकीत असलेली ५० हजारांची रोकड त्यांना दिसून आली नाही. आजूबाजूला त्यांनी पाहणी केली तोपर्यंत ५० हजारांचा चुना त्यांना छटाक भज्यांच्या पायी लागलेला होता.
याबाबत त्यांनी बोदवड पोलिसात तक्रार दिली असून, भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नगरपंचायतचे सीसीटीव्ही कॅमेरे निकामी
गांधी चौकात ज्या ठिकाणी त्यांनी दुचाकी लावली त्या ठिकाणी नगरपंचायतीचे हाय डेफिनेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पण दुर्दैवाने तेही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेले आहेत. त्यावर लाखोंचा निधी नगरपंचायतीने खर्च केला आहे. मात्र आज ते निकामी झाले आहेत.