धुळे : शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून महिनाभरात ५0 रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेतर्फे फॉगिंग मशीनने धुरळणी सुरू असली तरी नागरिकांनीही कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. शहरात डेंग्यूने चांगलाच कहर केला आहे. शहरातील प्रत्येक भागात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत आहे. गेल्या १ ते १0 ऑक्टोबर दरम्यान ३२ व १0 ते १८ ऑक्टोबर दरम्यान १८ असे ५0 रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत. तर रोज आठ ते नऊ संशयित रुग्ण आढळून येत आहेत. त्यात मोहाडी, मच्छीबाजार, पारोळारोड, देवपुरातील कृषीनगर रुग्णांची संख्याआहे. मनपापुढे आव्हानमहापालिकेतर्फे शहरातील संपूर्ण भागात धुरळणी करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी व सायंकाळी धुरळणीचे काम सुरू आहे. या धुरळणीमुळे डांसावर नियंत्रण मिळविता यईल, मात्र त्यांची उत्पत्ती थांबविण्यासाठी कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. या उपक्रमास शहरातून अद्यापही चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने साथ रोखण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहत आहे. नागरिकांना सहकार्याचे आवाहन आहे.
--------------
नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती होण्यासाठी आयुक्त दौलतखॉ पठाण यांनी आझादनगर परिसरात तेथील नगरसेवकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेतले. त्यांनी तेथील संपूर्ण परिसराची साफसफाई केली. तसेच केवळ मोहीम न राबविताना सफाई कर्मचारी काम करतात किंवा नाही, यावरही नगरसेवकांनी लक्ष केंद्रित करावे, नागरिकांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन केले. या वेळी नगरसेवक अमिन पटेल, सहायक आरोग्यअधिकारी रत्नाकर माळी व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, डेंग्यूबाबत मुस्लीम बहुल परिसरात जनजागृती व्हावी, म्हणून काही नागरिकांनी उर्दूत सीडी तयार करून त्याचे प्रसारण करीत आहे.