जळगाव : सरकारी कार्यालयातील कर्मचारी दैनंदिन कामकाज करताना ताजेतवाने, स्वस्थ तसेच तणावमुक्त राहावेत यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून पाच मिनिटांचा ‘योगा ब्रेक’ प्रत्येक शासकीय कार्यालय व कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचा करण्यात आला आहे. यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वाय ब्रेक’ ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येत असून, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तीन दिवसांपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. शामकांत भादलीकर यांनी दिली.
आयुष मंत्रालयाद्वारा काढण्यात आलेले पत्र नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. यामुळे आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार जळगाव विद्यापीठानेही विद्यापीठ परिसर, परिसंस्था, सर्व प्रशाला व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना योगा ब्रेक प्रोटोकॉलनुसार घेण्यासाठी ५ मिनिटे वेळ काढण्याचे निर्देश दिले आहेत.
ॲप सांगणार योगाच्या पद्धती आणि फायदे
अनेकवेळा काम करताना कर्मचाऱ्यांना ताणतणाव जाणवतो. मात्र, योगक्रिया शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही प्रभावित करतात. कार्पोरेट क्षेत्रात अनेकांना तणावाचा अनुभव येतो. पाच मिनिटांचा योगा ब्रेकचा उद्देश हा कामावरील लोकांना योगक्रियेशी परिचित करणे असा आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून ‘वाय ब्रेक’ नावाचे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. यात योगाच्या पद्धती आणि फायदे सांगितले गेले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला अँड्रॉईड आधारित वाय ब्रेक ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक केले आहे.