लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर नागरिकांकडून होत असलेल्या संतापाला आता कुठे सत्ताधारी गांभिर्याने घेताना दिसून येत आहेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढत जाणारी नाराजी पाहता गेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी मनपा फंडातून ४६ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रस्ते तयार करण्याचा ठराव केला होता. त्या कामांचे अंदाजपत्रक तयार झाले होते. मात्र, आता ४२ कोटींचा निधी देखील मंजूर झाल्याने या निधीतून जे रस्ते मंजुर होते. ते रस्ते कायम ठेवून ४६ कोटीतून होणाऱ्या रस्त्यांचे अंदाजपत्रक काही प्रमाणात बदलावे लागणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे.
४२ कोटींच्या कामावर स्थगिती होती. त्यामुळे मनपाने आपल्या फंडातूनच नवीन रस्त्यांचे काम हाती घेतले होते. त्यात एकूण २८ रस्त्यांचा कामांचा समावेश होता. मात्र, यापैकी काही रस्त्यांचा समावेश आधीच्या ४२ कोटींच्या कामांमध्ये देखील होता. आता ४२ कोटींची स्थगिती उठून रस्त्यांचा कामांसाठी मक्तेदाराला कार्यादेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे ४६ कोटीतील काही रस्त्यांचे अंदाजपत्रक बदलण्यात येणार आहे. लवकरच यावर काम सुरु होणार असून, मार्चपर्यंत निविदा प्रक्रिया पुर्ण करून ज्या भागात अमृत योजनेचे पुर्ण कामे झाली आहेत. त्या भागात रस्त्यांच्या कामांना एप्रिलपर्यंत सुरु करण्यात येतील अशी माहिती महापौरांनी दिली आहे.
३० कोटींच्या रस्त्यांसाठी पुन्हा प्रस्ताव
४२ कोटी व ४६ कोटीतून रस्त्यांची कामे जवळपास होणार आहेत. आता सत्ताधाऱ्यांनी मनपा फंडातून वाढीव भागासह उपनगरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी येत्या महासभेत ३० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. ही कामे देखील मनपा फंडातून होणार असून, आतापर्यंत ९२ कोटींची तरतुद शहरातील नवीन रस्त्यांसाठी करण्यात आली आहे. रस्त्यांसाठी मोठी तरतुद करण्यात आली असली तरी कामे लवकरात लवकर करण्यात यावी अशी अपेक्षा जळगावकरांकडून व्यक्त केली जात आहे.