जळगाव : शहरातील विविध भागात असलेल्या 42 कुपोषित बालकांबाबत सविस्तर माहिती सादर करून त्यांच्या आरोग्य स्थितीचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना एकात्मिक बालविकास समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. महिला बालकल्याण विभागांतर्गत एकात्मिक बालविकास समितीची बैठक उपायुक्त प्रदीप जगताप यांच्या दालनात शनिवारी झाली. बालवाडी अधीक्षक चंद्रकांत वांद्रे तसेच वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. मनपा क्षेत्रात विविध भागात 147 अंगणवाडय़ा आहेत. त्यात सुमारे हजारो विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. गोरगरीब कुटुंबांना शासन योजनेनुसार दिल्या जात असलेल्या पोषण आहाराचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्या संदर्भातील नियमित माहिती तयार ठेवावी, पोषण आहार वाटपात कमतरता येऊ नये अशा सूचना जगताप यांनी यावेळी दिल्या. शहरातील विविध भागात झोपडपट्टी परिसर, गरीब वस्त्यांमध्ये 42 कुपोषित बालके आहेत. त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीचा तसेच त्यांना देण्यात येत असलेल्या पोषण आहाराची यावेळी माहिती घेण्यात आली. कुपोषित बालकांच्या आरोग्य विषयक तपासणीचा आराखडा तयार करून त्याची माहिती नियमित सादर करावे अशा सूचना देण्यात आल्या.
शहरातील विविध भागात 42 कुपोषित बालके
By admin | Updated: October 4, 2015 00:37 IST