चंद्रकांत जाधव■ जळगाव
देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत १२ लाख हेक्टरने वाढ झाली असून ४00 लाख गाठींचे उत्पादन येईल, असा अंदाज आहे. लागवडीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे म्हणजेच क्रमांक एक आहे.
या वर्षी मान्सूनचे आगमन १३ जुलैनंतर झाले. यामुळे इतर पिकांच्या लागवडीचा किंवा पेरणीचा काळ निघून गेला. कापूस लागवडीची मुदत तेवढी शिल्लक होती. देशात मध्य भारतात सर्वाधिक कापूस लागवड झाली आहे. तर सर्वात कमी लागवड ही उत्तर भारतात झाली आहे. २0१३-१४ च्या कापूस हंगामाच्या तुलनेत २0१४-१५ च्या हंगामात कापसाची लागवड देशात १0 टक्क्यांनी वाढली आहे. तर सूतगिरण्यांच्या कार्यक्षेत्रात १६.८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या हंगामात ३८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. या हंगामात ती ४१ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. कोरडवाहू कापसाला पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस न आल्यास उत्पादनात १0 टक्क्यांनी घट होऊ शकते. परंतु कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) च्या सर्वेक्षणानुसार या कापूस हंगामात देशात ४0३ लाख गाठींचे उत्पादन होईल. तर कापूस सल्लागार मंडळाच्या अंदाजानुसार देशात ४00 लाख गाठींचे उत्पादन होऊ शकते.
----------
चीनचे धोरण जागतिक कापूस बाजारपेठेवर परिणाम करते. यंदा कापूस लागवडीत वाढ झाली आहे. विविध संस्थांचे अंदाज येत आहेत. उत्पादन भरपूर होईल. पण त्या दृष्टीने कापूस धोरणही असायला हवे.
-आर.डी.पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा (जि.नंदुरबार)