लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सेवानिवृत्तीची रक्कम विमा कंपनीत गुंतवल्यास चार वर्षांत दाम दुप्पट होईल, असे आमिष दाखवून रमेश गबा देवरे (रा. अक्कलकोट हौसिंग सोसायटी, खोटेनगर) व त्यांचा मुलगा सुनील यांना ३३ लाख २० हजार ५७२ रुपयाचा ऑनलाइन गंडा घातल्याप्रकरणी मंगळवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
रमेश देवरे कृषी विभागात कृषी सहाय्यक या पदावर नोकरीला होते. निवृत्त झाल्यानंतर २०१४ मध्ये गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीचा त्यांना फोन आला. लाइफ प्लस इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून या व्यक्तीने देवरे यांचे पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख विचारली व त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी इन्शुरन्स कंपनीकडून ऑफर आहे, त्यात पैसे गुंतवले तर चार वर्षात रक्कम दुप्पट होईल, असे या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, यानंतर देवरे यांचा मुलगा सुनील यांनीही या व्यक्तीशी संपर्क साधून खात्री केली व तो खरे सांगत असल्याचे खात्री पटल्याने संबंधित व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे अठरा धनादेश तयार केले व दिल्लीच्या पत्त्यावर पाठवले.
असे दिले धनादेश
डिवाइस व्हॅल्यू कार प्रायव्हेट लिमिटेड नावाने १,५२,९५७ रुपयांचे सात धनादेश, ड्रीमलॅण्ड डेव्हलपर्स या नावाने ५५ हजारांचे तीन धनादेश, लाइफ प्लस या नावाने ७७,२१८ रुपयांचे सहा, सिल्व्हर सेंड डेव्हलपर्स या नावाने १६,००५ रुपयांचे दोन असे एकूण १८ धनादेश तयार केले व ते सही करून दिल्लीच्या पत्त्यावर पाठविले. वेगवेगळे बँका व पेटीएमच्या माध्यमातून ही रक्कम कन्हय्यालाल शर्मा, अग्रवाल व गौरव शर्मा यासह वेगवेगळ्या लोकांच्या नावावर वर्ग झाली.
पेन्शन व दागिने मोडून भरले रक्कम
देवरे पिता-पुत्रांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली पेन्शन तसेच घरातील महिलांचे दागिने मोडून वेळोवेळी या इन्शुरन्स कंपनीच्या नावाने फोन केलेल्या लोकांच्या खात्यावर भरली. फेब्रुवारी २१ मध्ये या लोकांकडे पैशाची मागणी केली असता टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय देवरे यांना आला.
देवरे यांचे कोरोनाने निधन
दरम्यान, रमेश देवरे यांचे ८ मार्च २०२१ रोजी कोरोनामुळे निधन झाले. याच काळात गौरव शर्मा याचा देवरे यांच्या मोबाइलवर फोन आला तेव्हा सुनील यांनी वडिलांचे निधन झाले आहे, त्यामुळे त्यांनी गुंतवलेली रक्कम आम्हाला आता परत हवी आहे, असे सांगितले असता संबंधित व्यक्तीने फोन बंद करून बोलणे टाळले. त्यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव, मोबाइल नंबर तसेच कार्यालयाचा पत्ता विचारला असता तेदेखील टाळण्यात आले. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सुनील देवरे यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोट...
अनोळखी व्यक्तींनी केलेल्या फोनवर कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. दिल्ली, नोएडा व बिहार या भागात ऑनलाइन फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय आहे. कर्ज प्रकरण मंजूर करणे, विमा कंपनीत दामदुप्पट किंवा नोकरी लावणे अशा वेगवेगळ्या आमिषाने हेच गुन्हेगार लोकांशी संपर्क साधून फसवणूक करीत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये अधिकृत विमा कार्यालय जाऊनच व्यवहार करावा.
- बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन