चौबारी : सात दिवसांत नऊवेळा चोऱ्या : ग्रामस्थांमध्ये घबराट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : दुकानाचे कुलूप कटावणीने तोडून दुकानातील रोख रक्कम व किराणा मालासह साठ हजारांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना १५ रोजी रात्री चौबारी येथे घडली. सहा दिवसांपूर्वी चौबारी येथे आठ घरे फोडण्यात आली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संजय भागचंद जैन यांचे चौबारीत किराणा दुकान असून, १५ सप्टेंबरला रात्री ९ ते १६ रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील ३५ हजार रुपये रोख व २५ हजारांचा तेल, साखर, साबण असा किराणा माल एकूण साठ हजारांचा माल चोरून नेला आहे. घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर, हेड कॉन्स्टेबल भास्कर चव्हाण, सचिन चव्हाण, सुनील आगवणे, फिरोज बागवान यांनी भेट देऊन पंचनामा केला. श्वानपथक तसेच अंगुली मुद्रा पथक मागविण्यात आले होते. पोलिसांना दोन जणांवर संशय असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. मारवड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास भास्कर चव्हाण करीत आहेत.
सहा दिवसांपूर्वी झालेल्या घरफोड्यांचा सुगावा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.