जळगाव : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी आरटीई अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील २२३ पालकांनी ऑनलाइन अर्ज भरले.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमध्ये आरटीईच्या ३ हजार ६५ जागा राखीव आहेत. राखीव जागांवर पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणून पालकांना ३ ते २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत शासनाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी दुपारी ३ वाजेनंतर पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनाने संकेतस्थळ खुले करून दिले होते. सायंकाळी उशिरापर्यंत २२३ पालकांनी ऑनलाइन अर्ज भरले. पहिल्याच दिवशी आरटीई प्रवेश प्रक्रियेला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आला. दरम्यान, काही पालकांना तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागला.